गीतकार जावेद अख्तर यांनी दोन लग्नं केली. त्यांचं पहिलं लग्न हनी इराणींशी झालं होतं, ते लग्न १३ वर्षे टिकलं. हनी यांच्यापासून विभक्त झाल्यावर त्यांनी अभिनेत्री शबाना आझमीशी दुसरं लग्न केलं. पण शबाना यांना भेटण्यापूर्वी जावेद यांनी एका फ्रेंच तरुणी ला प्रपोज केलं होतं, असा खुलासा त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केला आहे. त्या तरुणीचं नाव जोसेन असं होतं. १९७७ मध्ये आलेल्या राजेश खन्ना यांच्या ‘त्याग’ चित्रपटाच्या सेटवर जावेद यांची जोसेनशी भेट झाली होती.

सायरस ब्रोचा यांना दिलेल्या मुलाखतीत जावेद अख्तर यांनी जोसेनला लग्नाची मागणी घातल्याचा किस्सा सांगितला. जावेद यांनी खुलासा केला की ते राजेश खन्ना यांच्या ‘त्याग’च्या सेटवर ‘हाथी मेरे साथी’च्या स्क्रिप्टवर चर्चा करण्यासाठी गेले होते. तेव्हा सेटवर एका फ्रेंच तरुणीशी त्यांनी थोडा विनोदी संवाद साधला होता. काही दिवसांनंतर जेव्हा ते ‘अंदाज’च्या सेटवर गेले तेव्हा त्यांना ती मुलगी पुन्हा भेटली. ती बॅकअप कलाकार म्हणून काम करत होती. जावेद म्हणाले, “काही दिवसांनंतर मी ‘अंदाज’च्या सेटवर गेलो आणि तिथे एक पार्टी सीन होता. त्याठिकाणी तिच मुलगी होती. कधीकधी असं वाटतं की आयुष्य काहीतरी प्लॅन करतंय. मग आमची मैत्री झाली आणि त्यानंतर तिने मला सांगितलं की ती तिच्या मैत्रिणींबरोबर ताजमहाल हॉटेलच्या मागे असलेल्या रेक्स हॉटेलमध्ये राहते. तिने मला शूटिंगनंतर भेटायला सांगितले म्हणून मी तिला भेटायला गेलो आणि तिने माझी इतर मैत्रिणींशी ओळख करून दिली आणि आम्ही चांगले मित्र झालो. काही दिवसांनी तिचे सर्व मित्र-मैत्रिणी परत जात होते पण ती इथेच राहिली.”

अभिनेता पुष्कर श्रोत्रीच्या घरी चोरी, घरकाम करणाऱ्या महिलेने लांबवला लाखोंचा ऐवज; चोरीची पद्धत वाचून चक्रावून जाल

जावेद म्हणाले, “ती थांबल्यानंतर आम्ही एकमेकांना रोज भेटू लागलो. कधी ती मला भेटायला यायची, तर कधी मी तिला भेटायला जायचो. पण ते खिशाला परवडणारं नव्हतं, यात माझे खूप पैसे खर्च होत होते. ताजपासून वांद्रेपर्यंत टॅक्सी १४ रुपये घेत असे. एके दिवशी मला जाणवलं की या भेटीचा माझ्या खिशावर परिणाम होतोय. मग मी तिला म्हणालो की एकतर तू परत जा किंवा माझ्याशी लग्न कर. ती म्हणाली ‘मी परत जाईन पण माझ्याकडे पैसे नाहीत’. मी तिला म्हणालो, ‘त्याची काळजी करू नकोस, मी त्याची सोय करतो.’ मग माझ्याकडे जे काही पैसे होते त्यातून मी तिचे तिकीट काढले आणि ती निघून गेली.”

“फरहानने मुलींच्या जन्म प्रमाणपत्रात धर्माच्या रकान्यात…”, जावेद अख्तर यांचा खुलासा

जोसेनने गेल्यानंतर जावेद यांना एक पत्र देखील लिहिलं होतं परंतु आपण तिला उत्तर देऊ शकलो नाही, असं ते सांगतात. तसेच तिच्या संपर्कात राहण्याची एकमेव संधी आणि पत्र दोन्ही आपण गमावलं, असं ते म्हणाले. खरं तर आयुष्यातील कोणत्या वळणावर कोण, कुठे, कोणाला भेटेल, हे सांगता येत नाही. तसंच जावेद यांच्या आयुष्यात घडलं. ते जोसेनला तब्बल ३८ वर्षांनी पुन्हा भेटले.

जावेद अख्तर म्हणाले, “बर्‍याच वर्षांनंतर मला काला घोडा महोत्सवाच्या शुभारंभासाठी आमंत्रित करण्यात आले होते. तिथे मी आणि शबाना पोहोचलो आणि आम्ही स्टेजकडे जात होतो आणि कोणीतरी मला ‘जावेद’ अशी हाक मारली. फ्रेंच अॅक्सेंटमध्ये माझ्या नावाचा उच्चार वेगळा ऐकू येतो. त्यामुळे मी वळून पाहिलं तर तिथे चष्मा घातलेली एक बाई उभी होती. मी तिला विचारलं, ‘जोसेन?’ ती ‘हो’ म्हणाली. त्यानंतर मी तिला थांबायला सांगितलं. मला मंचावर बोलण्यास सांगण्यात आलं. तेव्हा मी आयोजकांचे आभार मानले आणि त्यांच्यामुळे ३८ वर्षांनी एका जुन्या मैत्रिणीशी भेट झाल्याचं सांगितलं. तसेच तिथे मी जोसेनची ओळख करून दिली. त्यावेळी उपस्थित सर्वांनी जोसेनसाठी टाळ्या वाजवल्या होत्या.”

४ हजारांसाठी राष्ट्रपतींसमोर लालकृष्ण अडवाणींशी भांडलेले विधू विनोद चोप्रा; संतापलेले अडवाणी म्हणालेले, “तुझ्या वडिलांना…”

मुंबईत झालेल्या या भेटीनंतर जावेद अख्तर पॅरिसमध्ये पुन्हा एकदा जोसेनला भेटले. “तिने मला सांगितलं की तिला तीन मुली आहेत. त्यानंतर मी जेव्हा पॅरिसला गेलो तेव्हा मी तिच्या मुलींसाठी गिफ्ट घेतले. तिचा जोडीदार, तिन्ही मुली मला भेटायला आल्या होत्या, कारण त्यांना माझ्याबद्दल माहिती होती. मग ती म्हणाली, ‘एक मिनिट थांब’. ती आत गेली आणि परत आल्यावर तिने मला ३८ वर्ष जुने ते बोर्डिंग कार्ड दिले. ती म्हणाली, ‘माझ्याकडे बोर्डिंग कार्ड अजूनही आहे’,” अशी आठवण जावेद यांनी सांगितली.