Amitabh Bachchan Coolie Accident: ‘कुली’ सिनेमाच्या शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन यांचा अपघात झाला होता. १९८२ मध्ये या अपघातातून ते बचावल्यानंतर काही वर्षांनी १९८९ साली अमिताभ यांचे सासरे तरूण कुमार भादुरी यांनी पहिल्यांदाच जावयाच्या अपघाताबद्दल एका लेखातून सविस्तर माहिती दिली होती.
अमिताभ बच्चन यांचे सासरे एक प्रसिद्ध पत्रकार होते. त्यांनी इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडियाच्या लेखात अमिताभ यांचा अपघात, रुग्णालयातील आठवणींबद्दल लिहिलं होतं. “अपघात झाल्याचं कळाल्यावर आम्ही मुंबईत पोहोचलो तेव्हा तिथे अनेक मित्र होते, ज्यापैकी काहींना आम्ही ओळखत होतो आणि काहींना आम्ही आम्ही ओळखत नव्हतो. पण ते सगळे म्हणाले, ‘सगळा देश, जात, पात, धर्माचा विचार न करता अमिताभसाठी प्रार्थना करत आहे. त्यांना काहीच होणार नाही’. प्रार्थनेला काही अर्थ असेल तर अमितला काहीच होणार नाही, या विश्वासाने त्या रात्री मी शांत झोपलो होतो,” असं भादुरी म्हणाले होते.
रुग्णालयात कशी होती अमिताभ यांची अवस्था?
अमिताभ बच्चन यांचे सासरे नास्तिक होते. त्यामुळे पार्थनांमुळे बच्चन बरे झाले, या लोकांच्या मतांशी ते असहमत होते. “अपघातानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जया मला आणि माझ्या पत्नीला ब्रीच कँडी हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात घेऊन गेली. तिथे अमित एका बेडवर झोपले होते. त्याच्या शरीराला अनेक नळ्या लावल्या होत्या, त्याचे डोळे खोल गेले होते. त्याला पाहताच माझी पत्नी कोसळली आणि अमित कुजबुजले, ‘बाबा, मला झोप येत नाही.’ मी म्हणालो, ‘काळजी करू नका, झोप येईल,’ मी म्हणतोय त्याचा काहीच फायदा हे माहीत असूनही मी सांत्वन करत होतो,” असं तरूण कुमार भादुरी म्हणाले होते.
रेखा यांच्याबरोबरच्या नात्याबद्दल विचारल्यावर अमिताभ बच्चन म्हणाले होते, “ती माझी…”
डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे बचावले होते अमिताभ
बिग बींचा जीव वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणाऱ्या डॉक्टर व तज्ज्ञांना पुरेसे श्रेय दिले गेले नाही, असं त्यांच्या सासऱ्यांना वाटत होतं. “देशभरातील लोक अमिताभच्या बरे होण्यासाठी प्रार्थना करत होते. संपूर्ण देश एक माणूस बरा व्हावा, यासाठी प्रार्थना करत आहे, असं यापूर्वी घडलं नव्हतं. उपचारांनंतर अमिताभ यांचा जीव वाचला. माझी पत्नी आणि इतर लाखो लोक म्हणाले की ते ‘देवाच्या कृपेमुळे’ वाचले, पण मला ते मान्य नाही. मी माझी पत्नी आणि जयाला म्हटलं की जर अमित वाचले नसते तर सर्वांनी डॉक्टरांना दोष दिला असता. आता त्यांचा जीव वाचलाय तर लोकांनी डॉक्टरांचे कौतुक का केलं नाही? त्यांच्याकडे काहीच उत्तर नव्हतं. हा दैवी चमत्कार आहे असं त्यांना वाटलं होतं, पण मला तसं वाटत नाही. हे ब्रीच कँडी हॉस्पिटलमधील वैद्यकीय तज्ज्ञांनी केलेले चमत्कार होते,” असे तरूण कुमार भादुरी म्हणाले होते.
दरम्यान, अमिताभ बच्चन यांच्यावर अनेक आठवडे उपचार चालू होते. बरे झाल्यानंतर त्यांनी सर्व चाहत्यांचे आभार मानले होते. देशभरातील लोकांनी माझ्यासाठी प्रार्थना केली त्याबद्दल मी कृतज्ञ आहे, मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे प्रयत्न करेन, असं बिग बी दूरदर्शनला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले होते.
मनमोहन देसाई यांनी दिग्दर्शित केलेला ‘कुली’ चित्रपट १९८३ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या शूटिंगवेळी अमिताभ बच्चन यांचा अपघात झाला होता, त्याची माहितीही स्क्रीनवर देण्यात आली होती. तसेच बिग बींच्या अपघातानंतर चित्रपटाचा शेवट बदलण्यात आला होता. हा चित्रपट त्याकाळी ब्लॉकबस्टर ठरला होता.