बच्चन कुटुंब हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. मग ते चित्रपट असो वा त्यांचे वैयक्तिक आयुष्य. अमिताभ बच्चन यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळेदेखील अनेकदा चर्चांना उधाण येते. याआधी त्यांनी जाण्याची वेळ झाली, अशी एक पोस्ट शेअर केली होती. नुकतीच त्यांनी मी जातोय, अशी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

त्यांच्या या पोस्टमुळे चाहते चिंतेत असल्याचे दिसत आहे. याबरोबरच अनेकदा सहकलाकार त्यांच्याबरोबर काम करण्याचे किस्से सांगतात. काही दिवसांपूर्वी ऐश्वर्या राय(Aishwarya Rai)व अभिषेक बच्चन यांचा घटस्फोट होणार असल्याचे म्हटले जात होते. त्याला जया बच्चन(Jaya Bachchan) जबाबदार असल्याचेदेखील म्हटले गेले. मात्र, ऐश्वर्या व अभिषेक यांनी कार्यक्रमांना एकत्र हजेरी लावल्याचे दिसले. त्यानंतर या चर्चांना पूर्णविराम मिळाला. आता या सगळ्यात जया बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

एक काळ असा होता की, ऐश्वर्या राय व जया बच्चन यांच्यात उत्तम बॉण्डिंग असल्याचे दिसत होते. मात्र, काही काळापासून त्या एकत्र दिसल्या नाहीत. या सगळ्यात सोशल मीडियावर जया बच्चन व ऐश्वर्या राय यांचा एक व्हिडीओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यामध्ये जया बच्चन या ऐश्वर्या रायचे कौतुक करीत असून, तिचे बच्चन कुटुंबात मोठ्या प्रेमाने स्वागत करीत असल्याचे दिसत आहे. त्यावेळी ऐश्वर्या राय व अभिषेक बच्चन यांचा साखरपुडा झाला होता.

“ती वेळ योग्य नाही…”

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ २००७ सालचा आहे. ‘फिल्मफेअर’ पुरस्कार सोहळ्यातील हा व्हिडीओ आहे. जया बच्चन यांना ‘फिल्मफेअर लाइफटाइम अचिव्हमेंट’ पुरस्कार मिळाला होता. हा पुरस्कार स्वीकारताना जया बच्चन म्हणाल्या होत्या, “याआधीही मला हा पुरस्कार देण्यात आला होता; मात्र मी तो स्वीकारला नाही. कारण- त्यावेळी मला वाटले होते की, ती वेळ योग्य नाही. आता मी एका सुंदर व प्रेमळ मुलीची सासू होणार आहे, जिच्याकडे तिची मूल्ये आहेत आणि चेहऱ्यावर गोड हसू आहे. मी तुझे बच्चन कुटुंबात स्वागत करते. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे.” जया बच्चन यांचे हे बोलणे ऐकून ऐश्वर्या रायला अश्रू अनावर झाल्याचे व्हिडीओमध्ये पाहायला मिळते. तरीही तिने तिच्या चेहऱ्यावर हास्य कायम ठेवल्याचे दिसत आहे. पुढे जया बच्चन म्हणाल्या होत्या, “मला वाटते की, हा पुरस्कार स्वीकारण्याची हीच योग्य वेळ आहे.”

दरम्यान, ऐश्वर्या राय व अभिषेक बच्चन यांचे २००७ मध्ये लग्न झाले. त्यांना आराध्या ही मुलगी आहे. आराध्या व ऐश्वर्या यांच्यातील बॉण्डिंगदेखील चाहत्यांचे लक्ष वेधून घेते. आराध्या ऐश्वर्याबरोबर अनेक कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसते. ऐश्वर्या ‘पोन्नियिन सेल्वन २’मध्ये दिसली होती. चित्रपटातील तिच्या भूमिकेचे मोठे कौतुक झाले. आता आगामी काळात अभिनेत्री कोणत्या चित्रपटात प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.