बॉलीवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांच्या नात्याबद्दल आजही बोलले जाते. त्यापैकी एक जोडी आहे ती कबीर बेदी व परवीन बाबी यांची. त्यांच्या नात्याविषयी आजही अनेकदा चर्चा होताना दिसते. कबीर बेदी यांनी परवीन बाबी यांच्याबरोबर असलेल्या नात्यातून माघार घेतली, असे म्हटले जाते. मात्र, एका मुलाखतीत कबीर बेदी यांनी यावर खुलासा केला होता.

परवीन बाबी व कबीर बेदी यांचे का झाले होते ब्रेकअप?

१९८० मध्ये कबीर बेदी व परवीन बाबी यांच्या नात्याने चांगलेच लक्ष वेधून घेतले होते. कबीर बेदी यांचे लग्न झाल्यानंतर ते परवीन बाबी यांच्या प्रेमात पडले. त्याचदरम्यान, परवीन बाबी यांचे अभिनेता डॅनी डेन्जोंगपा यांच्याबरोबर ब्रेकअप झाले होते. कबीर बेदी यांनी त्यांच्या आत्मचरित्रातदेखील परवीन बाबी यांच्याबरोबरच्या नात्याबद्दल लिहिले होते. ‘स्टोरीज आय मस्ट टेल : द इमोशनल लाइफ ऑफ अॅन अॅक्टर’ या त्यांच्या आत्मचरित्रात त्यांनी लिहिलेय की, आम्ही आमच्या आयुष्यात कठीण काळातून जात असताना एकमेकांच्या प्रेमात पडलो.

कबीर बेदींनी ‘डिजिटल कॉमेंट्री’ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत कबीर बेदी म्हणाले होते, “मला जाणवले की परवीनची प्रकृती ठीक नाही. तिच्यामध्ये पॅरोनोईया या आजाराची लक्षणे दिसत होती. जेव्हा आम्ही इटलीनंतर लंडनमध्ये गेलो तेव्हा मी पाहिले की, तिची प्रकृती खालावत आहे. परंतु, तिची प्रकृती खालावतेय, हे तिला मान्य करायचे नव्हते. मला माहीत होते की, जर इलाज केला नाही, तर परिस्थिती आणखी बिघडेल आणि याच गोष्टीवरून आम्ही वेगळे झालो.”

पुढे अभिनेत्याने असेही म्हटले होते की, मी हे नाते संपवले नव्हते; तर परवीन बाबीने ते संपवले होते. मी तिला बरे होण्यासाठी, उपचार घेण्यासाठी मदत करीत होतो. पण, तिला भीती वाटत होती की, तिचे करिअर खराब होईल आणि तिची जी बाहेर प्रतिमा आहे, तिला धक्का लागेल. पॅरोनोईया असलेल्या लोकांना प्रत्येक गोष्टीची भीती वाटू लागते. तिने मला यासाठी सोडले, कारण- तिला वाटले की, उपचारांसाठी मी तिच्यावर दबाव टाकेन. डॉक्टरला समजले, तर तो संपूर्ण इंडस्ट्रीला सांगेल, माझं करिअर संपेल, असे तिला वाटत असे. त्यामुळे तिने मला सोडले; मी तिला सोडले नाही.

कबीर बेदी त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांबाबत ते असे म्हणाले की, मीडियाने मला दोषी ठरवले. असे सांगितले गेले की, मी परवीनला नाकारले आणि त्यामुळे तिच्या मनावर परिणाम झाला. पण, सत्य हे होते की, परवीनला त्याआधीसुद्धा मानसिक आरोग्यासंबंधित समस्या होत्या.मी नेहमीच तिला मदत करण्याचा प्रयत्न केला. तिची काळजी घेतली. मात्र, सगळ्यांना तिच्या आजाराबाबत समजेल याची परवीनला जास्त भीती होती.