स्वतःच्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर सोडणारी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आज ४९ वा वाढदिवस साजरा करत आहे. बालकलाकार म्हणून उर्मिलाने अभिनयाची सुरुवात केली अन् नंतर ९० च्या दशकात मात्र तिने रसिकांच्या मनावर राज्य केलं. उर्मिला चित्रपटाबरोबरच राजकारणातही उतरली, नुकतंच ती राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो यात्रेतसुद्धा सहभागी झाल्याचं आपण पाहिलं. याबरोबरच उर्मिला बऱ्याचदा वादाच्या भोवऱ्यातही अडकली होती.
बॉलिवूडची क्वीन कंगना रणौत आणि उर्मिला मातोंडकर यांच्यातही एकदा अशीच वादाची ठिणगी पडली होती ज्याची चांगलीच चर्चा झाली. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर कंगनाने बॉलिवूडवर निशाणा साधायला सुरुवात केली होती, त्यावेळी बऱ्याचदा कंगनाने ९०% चित्रपटसृष्टी ही ड्रग्सच्या आहारी गेलेली आहे अशी विधानं केली होती. एकंदरच कंगना त्यावेळी उघडपणे चित्रपटसृष्टीच्या विरोधात जाऊन वक्तव्य करत होती.
आणखी वाचा : भारतातील विमानतळावरील पहिले मल्टिप्लेक्स प्रवाशांच्या मनोरंजनासाठी सज्ज; नेमकं कुठे आहे हे चित्रपटगृह?
त्यावेळी उर्मिलाने एका मुलाखतीमध्ये कंगनाची चांगलीच पोलखोल केली होती. “कंगनाने मुंबई आणि महाराष्ट्रातील ड्रग माफियापेक्षा हिमाचल प्रदेशमधील समस्यांवर लक्ष द्यावं” असं उर्मिलाने एका मुलाखतीत म्हंटलं होतं. इतकंच नाही तर तेव्हा कंगनाला दिलेल्या सुरक्षेवरही उर्मिलाने टीका टिप्पणी केली होती. “एखादी व्यक्ती सतत ओरडत असेल तर याचा अर्थ ती व्यक्ती सत्य सांगत आहे असा होत नाही.” असं म्हणत उर्मिलाने कंगनाला उत्तर दिलं होतं. शिवाय कंगना हे सगळं केवळ बीजेपी कडून तिकीट मिळवण्यासाठी करत असल्याचा आरोपही तिने केला होता.
यानंतर मात्र कंगनाने उर्मिलावर पलटवार केला. ‘टाइम्स नाऊ’ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये कंगनाने उर्मिलाच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. कंगना म्हणाली, “ती ज्या पद्धतीने माझ्याविषयी बोलत होती ते खूप अपमानास्पद होतं, याबरोबरच मी हे सगळं बीजेपीकडून मिळणाऱ्या तिकीटासाठी करते हे तर फारच हास्यास्पद वक्तव्य होतं. ती स्वतःच्या अभिनयासाठी नव्हे तर सॉफ्ट पॉर्न अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. जर तिला तिकीट मिळू शकतं तर मला का नाही मिळणार तिकीट?”
कंगनाने केलेली ही टिप्पणी मात्र तिला चांगलीच महागात पडली, त्यानंतर तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आलं. उर्मिलासारख्या नावाजलेल्या अभिनेत्रीबद्दल केलेल्या या वक्तव्याचा चित्रपटसृष्टीतील लोकांनीही निषेध केला. सामान्य जनतेनेसुद्धा सोशल मीडियावर कंगनाच्या या वक्तव्याची निंदा केली होती. उर्मिलाने चित्रपटसृष्टीपासून फारकत घेतली आहे, तर कंगना तिच्या आगामी ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे.