करीना कपूर खानला (Kareena Kapoor Khan) यंदा हिंदी चित्रपटसृष्टीत २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. करीना तिचे वेगळ्या धाटणीचे सिनेमे आणि दमदार अभिनयामुळे ओळखली जाते. गेल्या २५ वर्षांत करीनाच्या काही भूमिका अतिशय लक्षवेधी ठरल्या, त्यापैकी एक म्हणजे विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘ओमकारा’मधील तिची भूमिका. या सिनेमात करीनाने ‘डॉली मिश्रा ‘ची भूमिका साकारली होती. अलीकडेच एका कार्यक्रमात तिने सांगितलं की या चित्रपटातील भूमिकेमुळे तिला स्वतःचा खूप अभिमान वाटला होता. तिची ही भूमिका पाहण्यासाठी तिने काही नामांकित दिग्दर्शकांसाठी ‘ओमकारा’चा एक खास शो आयोजित केला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बॉलिवूडमधील दिग्गज दिग्दर्शकांनी ‘ओमकारा’मधील तिची भूमिका पाहावी आणि तिचे कौतुक करावे, असे करीनाला वाटत होते. मात्र सगळे याउलट घडले. तिच्या अपेक्षेच्या विरुद्ध सैफ अली खानच्या ‘लंगडा त्यागी’ या भूमिकेने सर्वांचे लक्ष वेधले आणि करीनाऐवजी सैफचेच कौतुक झाले.

हेही वाचा…अभिनेत्री सैयामी खेरची मोठी कामगिरी, आयर्नमॅन ७०.३ शर्यत केली पूर्ण; अनुराग कश्यपने शेअर केली पोस्ट

एका कार्यक्रमात बोलताना करीना म्हणाली, “मला वाटलं की माझी भूमिका इतकी चांगली आहे की, मी सर्व दिग्दर्शकांना बोलावून माझे काम दाखवले पाहिजे. त्यामुळे मणिरत्नमपासून अनेक दिग्दर्शकांना मी बोलावले. मी हा शो आयोजित केला कारण मला वाटत होतं की मी या चित्रपटात खूप चांगले काम केले आहे. हा शो फिल्म सिटीमध्ये आयोजित करण्यात आला होता. तिथे या सिनेमातील सर्वच कलाकार आणि दिग्दर्शक उपस्थित होते. विशाल भारद्वाज, कोंकणा सेनशर्मा, विवेक ओबेरॉय, सैफ अली खान असे सगळेच तिथे उपस्थित होते. मला सगळे जण ‘डॉली मिश्रा ‘च्या भूमिकेत पाहतील, माझं कौतुक करतील असं मला वाटलं आणि मी खूप खुश होते,” असे करीनाने सांगितले.

अन् सैफचेच कौतुक झाले

करीनाने सांगितलं की मध्यांतरानंतर, सर्व लोक सैफ अली खानच्या भूमिकेबद्दल चर्चा करत होते. “मध्यांतरात सर्वजण बाहेर आले आणि म्हणाले, “आम्हाला तुझं आणि सगळ्यांचं काम आवडलं, पण सैफ अली खानने कमाल अभिनय केला आहे.’ चित्रपट संपल्यावरही सर्वजण फक्त सैफबद्दलच बोलत होते. मी विचार केला, ‘हे काय चाललंय? मी सगळ्यांना माझं कौतुक करायला बोलावलं होतं!’ पण सगळे जण सैफचे कौतुक करत होते,” करीनाने हसत हसत हा किस्सा सांगितला. ‘ओमकारा’च्या काही वर्षांनंतर सैफ आणि करीनाने डेटिंगला सुरुवात केली आणि पुढे लग्न केले.

हेही वाचा…दिवंगत श्रीदेवींना ‘या’ लोकप्रिय गायकासह करायचा होता चित्रपट, हिंदी शिकवण्याची ऑफरही दिलेली पण…

सैफला पाहायचे आहेत करीनाचे हे सिनेमे

करीनाला बॉलीवूडमध्ये २५ वर्षे पूर्ण झाले असून तिच्या सन्मानार्थ तिच्याच नावाने एका फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. यात तिचे गाजलेले सिनेमे दाखवण्यात येणार आहेत. करीनाला सिनेसृष्टीत २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आयोजित एका कार्यक्रमात सैफला तिच्या या फिल्म फेस्टिव्हलबद्दल काय वाटते ? त्याची काय प्रतिक्रिया होती ? असे प्रश्न विचारले असता, करीनाने सांगितले की, “सैफ या फिल्म फेस्टिव्हलची संकल्पना ऐकून खूपच आनंदी झाला होता.” तिने पुढे सांगितले की, सैफला माझे ‘ओमकारा’ आणि ‘अशोका’ हे चित्रपट या महोत्सवात पुन्हा पाहायचे आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When kareena kapoor hosted special omkara screening nobody praise her saif ali khan stole the show psg