Madhuri Dixit : अभिनेते रणजीत हे त्यांना साकारलेल्या नकारात्मक भूमिकांसाठी ओळखले जातात. खलनायकांच्या भूमिका करणारे रणजीत यांना खऱ्या आयुष्यात महिला घाबरायच्या. अनेक अभिनेत्री त्यांच्याबरोबर काम करण्यात संकोच करायच्या. हा सगळा त्यांच्या नकारात्मक पात्रांचा प्रभाव होता. एकदा तर माधुरी दीक्षित त्यांच्याबरोबर विनयभंगाचा एक सीन शूट केल्यानंतर खूप रडली होती.

रणजीत यांनी विकी लालवानीला दिलेल्या मुलाखतीत एका सिनेमात काम करतानाचा किस्सा सांगितला. माधुरी दीक्षितने रणजीत यांचे काही सिनेमे पाहिले होते आणि ती पहिल्यांदाच त्यांच्याबरोबर काम करत होती. त्यावेळी सेटवर असं काही घडलं की शूटिंगनंतर माधुरी खूप रडली होती.

रणजीत म्हणाले, “‘प्रेम प्रतिज्ञा’ असं चित्रपटाचं नाव होतं. तेव्हा माधुरी नवीन होती. माझी प्रतिमा ‘निर्दयी किलर, क्रूर खलनायक’ अशी तयार करण्यात आली होती. त्यामुळे तेव्हा मुलं- मुली मला घाबरायचे. माधुरीने माझ्याबद्दल ऐकलं होतं आणि त्यामुळे ती घाबरली होती. आमचा एकत्र विनयभंगाचा सीन होता. वीरू देवगण आमचे फाईट मास्टर होते. एका सीनमध्ये मी तिचा हात पकडून विनयभंग करायचा होता. मी दुसऱ्या शूटिंगसाठी जायचं असल्याने घाईत होतो आणि सेटवर माधुरीची अवस्था काय आहे, याबद्दल मला कल्पना नव्हती. मला नंतर तिच्याबद्दल समजलं.”

माधुरीला सेटवर लोकांनी सांगितलं होतं की मी वाईट नाही आणि शूटिंगनंतर तिलाही हेच जाणवलं. सीन पूर्ण केल्यानंतर दीक्षित रडू लागली, कारण मी तिला स्पर्श न करता विनयभंगाचा सीन शूट केला होता, असं रणजीत यांनी सांगितलं. “ती रडतेय हे मला जाणवलं. मग सेटवरील लोकांनी तिला शांत केलं आणि ‘मी चांगला माणूस आहे’ असं सांगितलं. तिने सीनसाठी होकार दिला. शूटिंग करताना मी माझ्या सहकारी कलाकारांना खूप सहकार्य करायचो. सीन कट झाल्यावर लोकांनी टाळ्या वाजवल्या. ती रडत होती. निर्मात्यासह इतर तिच्याकडे धावत आले आणि ती ठिक आहे का? असं तिला विचारलं. ती म्हणाली, ‘मला काहीच जाणवलं नाही. त्यांनी मला स्पर्शही केला नाही,” असं रणजीत म्हणाले.

माधुरी व रणजीत यांनी नंतर ‘किशन कन्हैया’ व ‘कोयला’ चित्रपटात एकत्र काम केलं होतं. रणजीत यांनी मुलाखतीत सांगितलं होतं की चित्रपटांमधील त्यांच्या खलनायकाच्या प्रतिमेमुळे त्या काळात त्यांच्या लग्नात अडचणी आल्या होत्या. तसेच करिअरमधील एका टप्प्यानंतर त्यांना एकाच धाटणीच्या भूमिाक मिळू लागल्या होत्या. “पुन्हा पुन्हा तेच करावं लागायचं, साडी पकडायची, केस ओढायचे आणि शेवटी मार खावा लागायचा,” असं ते म्हणाले.