माधुरी दीक्षितला ९० च्या दशकातील ‘लेडी सुपरस्टार’ म्हणून ओळखलं जातं. त्या काळात अनेक अभिनेत्रींना अंडरवर्ल्डकडून लक्ष्य केलं जायचं, अशाच एका डॉनला माधुरी दुबईत यावी असं वाटत होतं. मात्र, अभिनेत्री या गोष्टीला कधीच तयार झाली नाही. यानंतर तिला जीवे मारण्याचा कट रचण्यात आला होता, असा दावा लेखक आणि ज्येष्ठ पत्रकार जितेंद्र दीक्षित यांनी एका पॉडकास्टमध्ये केला आहे. तसेच सेवानिवृत्त एसीपी अविनाश धर्माधिकारी यांनी काही दिवसांपूर्वीच एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत या गोष्टीचा खुलासा केला होता.
माधुरी दीक्षित त्याकाळी बॉलीवूडमध्ये आघाडीची अभिनेत्री होती. तिचे असंख्य चाहते होते. ‘धकधक गर्ल’ एकामागून एक हिट चित्रपट देत होती. याचदरम्यान अंडरवर्ल्ड डॉन अनीस इब्राहिमची नजर माधुरी दीक्षितवर पडली.
अनीस इब्राहिम बॉलीवूड अभिनेत्रींना बेकायदेशीर कृत्यांमध्ये अडकवत होता, असं म्हटलं जायचं. त्याने माधुरी दीक्षितलाही अडकवण्याचा प्रयत्न केला. अनीस इब्राहिम मोठ्या पार्ट्या आयोजित करायचा; ज्यामध्ये काही नायिकाही सहभागी व्हायच्या आणि तो त्यांना महागड्या भेटवस्तू देखील द्यायचा. अनीसने माधुरीबरोबरही असंच केलं. माधुरीने दुबाईला जावं असं त्याला वाटत होतं पण, तिने हे काहीच मान्य केलं नाही.
जितेंद्र दीक्षित यांनी या पॉडकास्टमध्ये त्याकाळाचे पोलीस अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांच्याशी झालेल्या संभाषणातील काही महत्त्वपूर्ण गोष्टी या पॉडकास्टमध्ये सांगितल्या आहेत.
जितेंद्र दीक्षित म्हणाले, “ही गोष्ट मला अविनाश धर्माधिकारी यांनी सांगितली होती, त्यांनी त्यावेळी माधुरी दीक्षितचा जीव वाचवला होता. अनीस इब्राहिम चुकीच्या हेतूने माधुरी दीक्षितवर दुबईला येण्यासाठी दबाव टाकत होता. तो इतर अनेक नायिकांनाही बोलावत असे, त्यांना भेटवस्तू देत असे आणि त्याला जे काही करायचे ते करत असे. त्याची नजर माधुरी दीक्षितवरही होती. माधुरी दीक्षितने जाण्यास नकार दिला. यामुळे त्याने संतापून अभिनेत्रीला जीवे मारण्याचा निर्णय घेतला होता. ही माहिती क्राइम ब्रांचपर्यंत पोहोचली आणि क्राइम ब्रांचने अभिनेत्रीला सुरक्षा पुरवली, तिच्यावर लक्ष ठेवलं. त्यानंतर माधुरी दीक्षित काही वर्षे देशाबाहेरही गेली. हा एक मोठा धोका होता, पण माधुरीने यातून स्वत:ला सावरलं.”
अविनाश धर्माधिकारी याबद्दल सांगताना म्हणाले होते, “अनीस हा दाऊद इब्राहिमचा भाऊ होता. त्या वेळी एक शब्द खूप लोकप्रिय होता तो म्हणजे एमडी. शोध घेतल्यावर आम्हाला समजलं की, एमडी थ्रेड फक्त माधुरी दीक्षितसाठी वापरला जात होता. त्या काळात खंडणीसाठी अशाच प्रकारच्या धमक्या दिल्या जात होत्या. पण खंडणी मागण्याची किंवा घेण्याची पद्धत वेगळी होती, आम्ही चित्रपट उद्योगातील अनेक लोकांचे प्राण देखील वाचवले आहेत. बॉलीवूडमध्ये अंडरवर्ल्डचा हस्तक्षेपही वाढला होता. त्या काळात बॉलीवूडमध्ये अंडरवर्ल्डचा इतका प्रभाव होता की, कोणत्या चित्रपटात कोणता अभिनेता किंवा अभिनेत्री असावी हे अंडरवर्ल्ड ठरवत असे.”