हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते म्हणून मनोज बाजयेपींना ओळखले जाते. आपल्या दर्जेदार अभिनयाने मनोज यांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे. अनेक सुरपहिट चित्रपटांमध्ये मनोज बाजपेयींनी काम केले आहे. तसेच सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरही मनोज यांची चलती आहे. पण तुम्हाला माहितीये का मुंबईत अभिनेता बनण्याचं स्वप्न घेऊन आलेल्या मनोज बाजपेयी यांच्या आयुष्यातही एक वेळ आली होती जेव्हा त्यांनी हे शहर सोडून जायचा निर्णय घेतला होता.
त्यावेळी मनोज यांना हवे तसे कामही मिळत नव्हते अन् त्यांनी ‘स्वाभिमान’ या टीव्ही सिरियलमध्ये काम करायचा निर्णय घेतला होता. मनोज यांची मालिकांमध्ये काम करायची अजिबात इच्छा नव्हती, तेव्हा त्या मालिकेचे निर्माते व प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट यांनी मनोज बाजपेयी यांनी एक मोलाचा सल्ला दिला होता. त्यावेळी त्यांनी मनोज यांच्यातील क्षमता ओळखली होती.
‘चलचित्र टॉक्स’ या पॉडकास्ट शोमध्ये मनोज बाजपेयी यांनी हजेरी लावली त्यादरम्यानच मनोज यांनी या गोष्टीचा खुलासा केला. मनोज म्हणाले, “मी नाटक करूनही मला म्हणावं तसं काम मिळत नव्हतं, जी लोक माझं कौतुक करायचे त्यांनीही आता माझ्यावर शंका घ्यायला सुरुवात केली होती. त्यावेळीच मला ‘स्वाभिमान’च्या प्रोडक्शन हाऊसमधून फोन आला. मी त्यावेळी खूप हट्टी होतो, मी टेलिव्हिजनसाठी काम करणार नाही असंच ठरवलं होतं कारण मी जर तिथे काम करायला सुरुवात केली तर मी भ्रष्ट होईन, मला चांगलं काम करता येणार नाही. पण माझ्या एका मित्राने मला जबरदस्ती त्या सिरियलमध्ये काम करायला भाग पाडलं.”
त्याच मालिकेचे निर्माते होते महेश भट्ट. मनोज यांच्या अभिनयाची ‘स्वाभिमान’च्या सेटवर प्रशंसा होऊ लागली. निर्माते महेश भट्ट यांनीही मनोज यांना एक मोलाचा सल्ला दिला. त्यांना मनोज बाजपेयी निराश असल्याचं जाणवत होतं. महेश भट्ट तेव्हा मनोज यांना म्हणाले, “तू नसीरुद्दीन शाह यांच्याच पठडीतला अभिनेता आहे, त्यामुळे हे शहर सोडून जायचा विचार करू नकोस. तुझ्या डोळ्यात मला निराशा दिसत आहे, पण तू हे शहर सोडू नकोस. तू कधीच विचार केला नसशील इतकं हे शहर तुला देईल.” अन् झालंही तसंच ‘स्वाभिमान’नंतर राम गोपाल वर्मा यांचा ‘सत्या’ प्रदर्शित झाला आणि मनोज बाजपेयी रातोरात स्टार झाले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही.