एकेकाळची यशस्वी बॉलीवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी सध्या महाकुंभमेळ्यात संन्यास घेतल्याने चर्चेत आहे. महाकुंभात तिला किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर बनवण्यात आले आहे. ही घोषणा झाल्यापासून अनेकांनी त्यावर आक्षेप घेतला आहे. मात्र, वाद ममतासाठी नवे नाहीत. सिनेसृष्टीत सक्रिय असताना ती वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत राहिली होती. तिचे ड्रग्ज प्रकरणात नावही आले होते. आज ममता कुलकर्णीचा असाच एक जुना किस्सा जाणून घेऊयात.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना मॉरिशसमध्ये घडली होती. ममता व अमीषा पटेल या दोघीही एका पार्टीत गेल्या होत्या, सगळं काही नीट सुरू होतं. पार्टीत जेवण वाढण्यात आलं आणि ममता संतापली. तिने तेथील वेटर आणि स्वयंपाक बनवणाऱ्यांना जेवण चांगलं नसल्याने फटकारलं. तिथे उपस्थित असलेली अमीषा हे सगळं पाहून मध्यस्थी करण्यासाठी तिथे गेली. ममता वेटरला बोलत होती ते पाहून अमिषा पटेलने एक कमेंट केली, त्यानंतर भडकलेली ममता तिला म्हणाली, “तू मॉरिशसला हेअर ऑइलच्या शूटिंगसाठी आली आहेस ना? तुझ्या माहितीसाठी सांगते की यासाठी मला १५ लाख रुपये मिळतात. तुला तर फक्त फक्त एक लाख रुपये मिळाले आहेत. मग स्टार कोण? तू की मी?”
अमीषा पटेलने स्वतः केलेला खुलासा
या घटनेनंतर अनेक वर्षांनी अमीषा पटेलने मसाला डॉट कॉम नावाच्या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतील या वादाबद्दल सांगितलं होतं. ती म्हणालेली की जेवण चांगलं नसल्याने ममता व तिच्या मॅनेजरने शेफ व स्टाफला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावेळी अमीषाने मध्यस्थी केली आणि सांगितलं की सर्वजण हेच जेवण जेवत आहेत. हे ऐकून ममता व तिची मॅनेजमेंट टीम चिडली. “आम्ही मिस्टर बजाजच्या डिनर पार्टीत होतो. ममता जेवणाबाबत तक्रार करत होती आणि सगळे वैतागले होते, कारण ममता व तिचे मॅनेजरही तिथल्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत होते,” असं अमीषा म्हणाली होती.
अमीषाने सांगितलेलं की तिने ममताला थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने स्टारडमचा उल्लेख केला. शेफने भारतीय जेवण बनवण्याचा प्रयत्न केला होता. “मॉरिशसमध्ये असूनही होस्ट शेफकडून चांगलं भारतीय जेवण बनवून घेण्याचा प्रयत्न ककरत होते. मला नाही वाटत की त्यासाठी तिने तक्रार करायला हवी होती,” असं अमीषा म्हणाली होती. “मी हेच ममताला सांगितलं पण ती माझ्यावर रागावली कारण तिच्या मते ती मोठी स्टार होती. तू स्वतःला काय समजतेस?” असं ममताने म्हटल्याचं अमीषाने सांगितलं होतं.
ममता कुलकर्णीच्या मॅनेजरने दिलेली अमीषाला धमकी?
अमिषा पटेलने सांगितलेलं की जेव्हा तिचा आणि ममताचा वाद वाढला तेव्हा ममताच्या मॅनेजरने तिला मारहाण करण्याची धमकी दिली होती. पण अमीषाची आई आशा पटेल यांनी ममताच्या मॅनेजरला माझ्या मुलीला हातही लावायचा नाही, अशी ताकिद दिली. अमीषाची आई ममता आणि तिच्या मॅनेजरवर खूप चिडल्या होत्या. खुद्द अमीषानेच हा प्रसंग सांगितला होता.