Rajesh Khanna Mehmood Controversy : राजेश खन्ना हे ६०-७० च्या दशकातील सुपरस्टार होते. त्यांनी एकापाठोपाठ एक १५ सुपरहिट सिनेमे दिले होते. राजेश खन्ना यांना बॉलीवूडचे पहिले सुपरस्टार म्हटलं जातं. राजेश खन्ना यांना जे स्टारडम आणि प्रेम मिळाले ते इतर कोणत्याही अभिनेत्याला मिळालं नव्हतं.

राजेश खन्ना यांना प्रचंड यश मिळालं आणि त्या स्टारडममुळे ते अहंकारी झाले असं म्हटलं जातं. ते सेटवर उशिरा जायचे, सकाळच्या शूटिंगसाठी ते संध्याकाळी पोहोचायचे आणि काही वेळा अनेक दिवस गायब व्हायचे. राजेश खन्ना यांनी त्यांचं मानधनही वाढवलं होतं. याच गोष्टींमुळे राजेश खन्ना यांच्या करिअरला नंतर उतरती कळा लागली, असं म्हणतात.

राजेश खन्ना व महमूद यांचा वाद

ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक राशीद किदवई यांनी त्यांच्या ‘नेता अभिनेता: बॉलीवूड स्टार पॉवर इन इंडियन पॉलिटिक्स’ या पुस्तकात एका प्रसंगाचा उल्लेख केला आहे. दिग्दर्शकापासून ते संपूर्ण युनिटपर्यंत सर्वजण राजेश खन्ना यांच्या नखऱ्यांमुळे कंटाळले होते.

राजेश खन्ना हे सुपरस्टार होते, त्यामुळे ते वेळेवर आले किंवा नाही तरी त्यांच्याबरोबर चित्रपट करू इच्छिणाऱ्यांची कमी नव्हती. त्यांच्या स्टारडममुळे त्यांचे चित्रपट हिट झाले आणि त्याचा फायदा निर्मात्यांना झाला. त्यामुळेच त्यांचं उशिरा येणं दिग्दर्शक आणि निर्मात्यांनीही सहन केलं.

‘जनता का हवलदार’ सेटवर राजेश खन्ना यांना मारलेलं

मेहमूद यांनी राजेश खन्ना यांना ‘जनता का हवालदार’ या चित्रपटासाठी साइन केलं होतं, तेव्हा त्यांचं स्टारडम कमी होऊ लागलं होतं. पण सवयीमुळे राजेश खन्ना नेहमी चित्रपटाच्या सेटवर उशिरा यायचे. सकाळच्या शूटिंगसाठी ते दुपारनंतर यायचे. मेहमूद या चित्रपटाचे निर्मातेही होते. सुरुवातीला त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले, पण खन्ना यांनी उशिरा येण्याची सवय सुटली नाही, त्यामुळे मेहमूद यांनी राजेश खन्ना यांना जाब विचारला. राजेश खन्ना यांना हे अजिबात आवडलं नाही, त्यामुळे त्यांनी असं उत्तर दिलं की मेहमूद यांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी राजेश खन्ना यांना झापड लगावली होती.

मेहमूद म्हणाले, “सुपरस्टार असशील तू तुझ्या घरी, पण इथे मी तुला पैसे दिले आहेत. तू पैसे घेऊन काम करणारा अभिनेता आहेस.” मेहमूद यांनी झापड मारल्यानंतर राजेश खन्ना स्तब्ध झाले आणि काहीच उत्तर दिलं नाही.

‘जनता का हवालदार’ कसा पूर्ण झाला?

काही काळाने राजेश खन्ना व मेहमूद यांच्यातील मतभेद दूर झाले आणि त्यांनी चित्रपट पूर्ण केला. ‘जनता का हवालदार’ १९७९ मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाला आता ४६ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याकाळी या मेहमूद यांनी खन्नांना लगावलेल्या झापडची खूप चर्चा झाली होती. वृत्तपत्रांमध्येही यासंदर्भात बातम्या आल्या होत्या.

‘जनता का हवालदार’मध्ये राजेश खन्ना, योगिता बाली, हेमा मालिनी, अशोक कुमार, ललिता पवार, शुभा खोटे, लीला चिटणीस, कन्हैया लाल हे कलाकार होते. चित्रपटाचं संगीत राजेश रोशन यांनी दिलं होतं व दिग्दर्शन मेहमूद यांनी केलं होतं.