यंदाचं वर्षं भारतीयांसाठी खास ठरलं. राजामौली यांच्या ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याने काही दिवसांपूर्वी गोल्डन ग्लोब पुरस्कार पटकावला. त्यानंतर आता या गाण्याला ऑस्कर पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं. संपूर्ण देशाचं उर अभिमानाने भरून आलं. लोकांनी यावर कौतुकाचा वर्षाव केला, मोठमोठे सेलिब्रिटीज, राजकीय नेते यांनीदेखील विजेत्यांचे अभिनंदन केले. खुद्द ऑस्कर विजेत्या ए.आर. रहमान यांनीदेखील यावर टिप्पणी केली.
‘नाटू नाटू’ला ऑस्कर मिळाल्यावर काही लोकांनी आनंद साजरा केला तर सोशल मीडियावर काही लोकांनी नाकं मुरडली. या गाण्याला ऑस्कर देण्याएवढं नेमकं यात काय आहे असा सुर काही लोकांनी लावला. जेव्हा ए.आर. रहमान यांच्या ‘जय हो’ या गाण्याला ऑस्कर मिळाला तेव्हासुद्धा अशाच काहीशा प्रतिक्रिया आपल्याला बघायला मिळाल्या होत्या. एवढंच नव्हे तर तुम्हाला माहिती आहे का, की रहमानला ऑस्कर मिळाल्यावर आपल्याच देशातील एका लोकप्रिय संगीतकाराने रहमान यांच्यावर ऑस्कर खरेदी केल्याचा आरोप केला होता.
आणखी वाचा : “जो चित्रपट दहा मिनिटंही…” ओटीटी प्लॅटफॉर्म्सच्या ‘या’ गोष्टीवर पहलाज निहलानी संतापले
लोकप्रिय संगीतकार इस्माईल दरबार यांनी त्यावेळी रहमानने ऑस्कर विकत घेतला असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यावेळी त्यांच्यावर बरीच टीकादेखील झाली होती. थेट अकादमीच्या लोकांनी त्यांच्यावर तक्रार दाखल करण्यापर्यंत प्रकरण तापलं होतं. नंतर मात्र इस्माईल दरबार यांनी त्यांचं वक्तव्य मागेदेखील घेतलं होतं. सिनेतज्ञ आणि समीक्षक तरण आदर्श यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये इस्माईल दरबार यांनी याबद्दल स्पष्टीकरण दिलं होतं.
या मुलाखतीमध्ये इस्माईल दरबार म्हणाले, “हो मी रहमानने ऑस्कर विकत घेतल्याचं वक्तव्य दिलं होतं. जेव्हापासून मी रहमानचं पीआर आणि व्यवसाय याकडे बघायचा दृष्टिकोन पाहिला आणि तो संगीतापासून दूर जातोय असं वाटलं तेव्हापासूनच मला रहमानचा तिटकारा आहे. पहिले मला वाटायचं कि हा माणूस काहीतरी वेगळा विचार करणारा आहे, पण जेव्हापासून रहमान आणि त्याचा पीआर ग्रॅमी, ऑस्कर, हॉलिवूड प्रोजेक्टच्या मागे लागलाय तेव्हापासून त्याच्या कामातही आपल्याला फरक, गडबड जाणवू लागली आहे. ज्या कामासाठी तुला विधात्याने इथे पाठवलं आहे, ज्या कामामुळे तुला आज संपूर्ण जग ओळखतं, त्या कामाशी तरी बेईमानी करू नकोस. जो ऑस्कर मिळाला तो नेमका कोणत्या कारणासाठी मिळाला, कोणत्या गाण्याला मिळाला, त्यामागची मानसिकता काय? हे सगळं रहमान यांना ठाऊक आहे.”
याच मुलाखतीमध्ये इस्माईल दरबार यांनी हे वक्तव्य परत का घेतलं याविषयीसुद्धा भाष्य केलं. ते म्हणाले, “हे बघा मलाही उद्या ऑस्कर मिळवायचा आहे, ऑस्कर जिंकायची इच्छा तर प्रत्येकामध्येच असते. त्यामुळे जेव्हा मी हे वक्तव्य केलं तेव्हा तिथल्या अकादमीच्या काही लोकांना ते खटकलं, आता माझा वाद त्यांच्याशी नाही त्यामुळे त्यांच्याशी वैर घेतलं तर ते मलाही उद्या उभं करणार नाही. त्यामुळे जेव्हा या गोष्टी केस आणि तक्रारीपर्यंत गेल्या तेव्हा मी माझं वक्तव्य मागे घेऊन माफी मागणं योग्य समजलं आणि तसं केलं.” इस्माईल दरबार यांनी ‘देवदास’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘किसना’ अशा चित्रपटांना संगीत दिलं आहे.