नेहा धुपिया बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. आत्तापर्यंत तिने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये कामं केली आहेत. सध्या नेहा चित्रपटात झळकत नसली तरी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. निरनिराळे फोटो व व्हिडीओ पोस्ट करत ती चाहत्यांना अपडेट देत असते. चित्रपटानंतर आता नुकतेच नेहाने ओटीटीवरही पदार्पण केले आहे. नुकताच तिचा ओटीटीवर ‘नो फिल्टर नेहा’चा दुसरा सीझन प्रदर्शित झाला. या कार्यक्रमातून ती बॉलीवूडमधील अनेक कलाकारांच्या मुलाखती घेते.

चित्रपटातून ब्रेक घेतल्यावर वाढलेले वजन अन् गरोदर राहिल्याने झालेले बदल यामुळे नेहाला चित्रपटसृष्टीत पुन्हा कमबॅक करताना आलेले अनुभव तिने नुकतेच एका मुलाखतीदरम्यान शेअर केले आहेत. ‘झुम’शी संवाद साधताना नेहा म्हणाली, “मी जेव्हा या चित्रपटसृष्टीत आले तेव्हा महिला कलाकारांना एका ठराविक साच्यातल्याच भूमिका मिळायच्या. जर तुम्ही त्या साच्यात फिट बसत नसाल तर तुम्ही यासाठी योग्य नाही असं सरसकट ठरवलं जायचं. आता चित्र फार वेगळं आहे, कास्टिंगदेखील अगदी चपखल होतं, पण मला बऱ्याचदा कामावरून काढून टाकण्यात आलं आहे. माझा चेहेरा आणि वजन कमी करण्यासाठी मी दिलेला नकार यामुळे मलाही बऱ्याचदा नकार पचवावा लागला आहे.”

आणखी वाचा : शिक्षण राहिलं अपूर्ण, सेटवर तब्बूच्या साड्यांना केलेली इस्त्री; बॉलिवूडच्या ‘या’ सुपरहीट दिग्दर्शकाचा आहे सर्वत्र बोलबाला

पुढे नेहा म्हणाली, “मी जेव्हा गरोदर होते तेव्हा एका कार्यक्रमातून मला काढून टाकण्यात आलं होतं, अन् त्यानंतर तब्बल ८ महीने त्यांनी तो कार्यक्रम माझ्याशिवाय शूट केला. जेव्हा मला ही गोष्ट समजली तेव्हा मी त्यांना याबद्दल विचारलं तेव्हा ते म्हणाले की त्यांना माझ्याबरोबर काम करायचंच नाहीये त्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतला. असे बरेच प्रकार माझ्याबाबतीत घडले आहेत, पण आता मात्र या गोष्टींचा माझ्यावर फार परिणाम होत नाही.”

नेहा धुपियाच्या कामाबद्दल बोलायचे तर, ती शेवटची २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ए थर्सडे’मध्ये दिसली होती. या चित्रपटात नेहाबरोबर यामी गौतमची मुख्य भूमिका होती. यामध्ये नेहाने पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. तसेच नेहाचा ‘रोडीज’ शोसुद्धा खूप गाजला होता. आता लवकरच नेहा अभिनेता गुलशन देवैयासह ‘थेरपी शेरपी’ या नव्या वेबसीरिजमध्ये झळकणार आहे.