बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान हा त्याची स्टारडमसाठी, चार्मसाठी अन् सुपरहीट ब्लॉकबस्टर चित्रपटांसाठी ओळखला जातो. याबरोबरच शाहरुख त्याच्या आणखी एका वाईट सवयीमुळेही ओळखला जातो, ती सवय म्हणजे धूम्रपान. शाहरुखने आजवर कधीच त्याची धूम्रपानाचे व्यसन लोकांपासून लपवून ठेवले नाही. बऱ्याच जुन्या मुलाखतींमध्ये तर सिगारेट ओढतच प्रश्नांची उत्तरे देताना आपल्याला पाहायला मिळेल. बऱ्याचदा त्याने आपली सवय फार वाईट आहे अन् ती आपल्याला सोडायची आहे असे कबूलही केले.
शाहरुखच्याच याच सवयीचा एक किस्सा पाकिस्तानी अभिनेते जावेद शेख यांनी सांगितला आहे. जावेद यांनी ‘ओम शांती ओम’ या चित्रपटात शाहरुखच्या वडिलांची भूमिका निभावली होती. ‘ओम शांती ओम’ चित्रपटाच्या सेटवर धूम्रपान करण्यास सक्त मनाई होती, ज्यांना धूम्रपान करायचे असायचे ते सेटच्या बाहेर जात असत. यात जावेद शेखसुद्धा होते, परंतु शाहरुखसाठी मात्र वेगळे नियम असत अन् याबद्दलचा एक किस्सा जावेद यांनी नुकताच एका मुलाखतीदरम्यान सांगितला.
‘देसी टीव्ही’शी संवाद साधताना जावेद म्हणाले, “त्यावेळी ‘ओम शांती ओम’च्या सेटवर फोटो काढायला अन् धूम्रपान करण्यास सक्त मनाई होती. त्यावेळी मी सिगारेट ओढायचो अन् त्यासाठी मला बऱ्याचदा सेटच्या बाहेर जावं लागायचं. पण जेव्हा शाहरुख सेटवर यायचा तेव्हा त्याच्यासाठी खास सोय केली जायची, जेव्हा शाहरुख पाकिटातून सिगारेट काढायचा तेव्हा एक वेगळं टेबल आणि एशट्रे त्याच्यासाठी आणून दिला जायचा.”
जेव्हा चित्रपटाचं चित्रीकरण सुरू झालं होतं तेव्हा शाहरुख जावेद यांना म्हणाला होता की त्यांना काहीही हवं असल्यास थेट त्याच्याकडेच येऊन मागावं. याबद्दल जावेद म्हणाले, “मी एकेदिवशी शाहरुखजवळ गेलो आणि त्याला विचारलं की मीसुद्धा सिगारेट ओढतो अन् ब्लॅक कॉफी घेतो, पण मला तुझ्यासारखं दिमाखात सेटवर सिगारेट ओढायची आहे.” जावेद यांची विनंती ऐकताच लगेच शाहरुखने त्यांच्या साठी खास टेबल व एशट्रेचा बंदोबस्त केला. हीच आठवण त्यांनी नुकतीच एका मुलाखतीदरम्यान सांगितली. ‘ओम शांती ओम’मध्ये शाहरुख खान, दीपिका पदूकोण, श्रेयस तळपदे, अर्जुन रामपाल,सारखे कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये होते.