मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाचा सूत्रधार आणि २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार डॉन दाऊद इब्राहिम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दाऊद इब्राहिमला कराचीमध्ये विषबाधा झाल्याची बातमी समोर आल्याने एकच खळबळ माजली. तो रुग्णालयात असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत असंही सांगितलं जात होतं, परंतु या वृत्ताला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. शिवाय आता या सगळ्या अफवा असून दाऊद एकदाम ठणठणीत असल्याचंही सांगितलं जात आहे.
यामुळे दाऊदबद्दल सर्वत्रच चर्चा होताना दिसत आहे. गुन्हेगारी विश्वाप्रमाणेच क्रिकेट आणि मनोरंजन क्षेत्रातही दाऊदचा एकेकाळी चांगलाच दबदबा होता. खासकरून बॉलिवूडवर त्याची चांगलीच पकड होती. कित्येक निर्मात्यांना संरक्षण देणं अन् त्याच्या नावाखाली खंडणी वसूल करणं, कित्येक अभिनेते आणि अभिनेत्री यांना धमकावणं याबरोबरच चित्रपटासाठी आर्थिक सहाय्य करणं अशा वेगवेगळ्या मार्गांनी दाऊद बॉलिवूडवर राज्य करायचा. खासकरून ९० च्या दशकात बॉलिवूडमधील मंडळी आणि दाऊद यांचे संबंध उघडकीस आले होते.
या सगळ्या विरोधात मात्र एका बॉलिवूड अभिनेत्रीने आवाज उठवला अन् अंडरवर्ल्डला सामोरी गेली. ती अभिनेत्री म्हणजे प्रीती झिंटा. २००१ साली ‘चोरी चोरी चुपके चुपके’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान प्रीतीला ५० लाख रुपये खंडणी देण्यासाठी फोन आला असल्याचं तिने कोर्टात सांगितलं होतं. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी प्रीतीने त्या एकूणच घटनेबद्दल एका मुलाखतीमध्ये खुलासा केला होता. त्यावेळी शाहरुख खान, सलमान खान, राकेश रोशन, महेश मांजरेकरसारख्या कलाकारांनाही असेच खंडणीचे फोन आले होते, परंतु या सगळ्यांनी कोर्टात याबद्दल काहीच भाष्य केलं नाही.
आणखी वाचा : “तो फक्त फरारी…”, दाऊद इब्राहिमच्या भेटीनंतर दिवंगत ऋषी कपूर यांनी केला होता महत्त्वाचा खुलासा
इतकंच नव्हे तर ‘चोरी चोरी चुपके चुपके’चे निर्माते भरत शाह हे अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकिलकडून पैसे घेऊन चित्रपट बनवत असल्याचीही तेव्हा चर्चा होती. सगळ्या कलाकारांनी मात्र कोर्टात आपले वक्तव्य बदलले परंतु प्रीती झिंटाने याविरोधात भूमिका घेतली अन् आवाज उठवला. ‘इंडिया टूडे’च्या एका कार्यक्रमात प्रीती म्हणाली, “जर कोर्टात कुणीच यावर भाष्य करणार नाहीये हे मला ठाऊक असतं तर कदाचित मीसुद्धा हे धाडस करू शकले नसते. तो माझ्या आयुष्यातील अत्यंत भयानक काळ होता. मी जे काही कोर्टात वक्तव्य दिलं ते पुढच्या दहा मिनिटांतच टेलिव्हिजनवर झळकलं होतं.”
पुढे प्रीती म्हणाली, “मला धमक्यांचे फोन येत होते तिथवर सगळं ठीक होतं, मी त्याकडे फार लक्ष देत नव्हते, पण नंतर त्यांनी शिवीगाळ करायला सुरू केल्यावर माझी सहनशक्ति संपली. माझं डोकं प्रचंड फिरलं, मी कोणताही त्रास सहन करू शकते, पण कुणी विनाकारण शिवीगाळ करत असेल तर ते मला सहन होत नाही. तेव्हा +९२ या क्रमांकापासून सुरू होणारे फोन कॉल्स घ्यायचे नाहीत हे मला तेव्हाच समजलं. कदाचित तेव्हा माझं लग्न झालं नव्हतं, मला मूलबाळ नव्हतं त्यामुळेच मी कोर्टात निडरपणे माझी बाजू मांडू शकले.” त्यावेळी हे प्रकरण चांगलंच गाजलं होतं, साऱ्या बॉलिवूडने अंडरवर्ल्डपुढे हात टेकले होते परंतु एकटी प्रीती तेव्हा त्यांच्यासमोर निडरपणे उभी होती, यावरून तिचं प्रचंड कौतुकही झालं.