बंगाली सुपरस्टार प्रोसेनजीत चॅटर्जी (Prosenjit Chatterjee) हे प्रसिद्ध अभिनेते विश्वजित चॅटर्जी यांचे सुपूत्र आहेत. प्रोसेनजीत यांनी बालकलाकार म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. सध्या ते त्यांचा आगामी चित्रपट ‘अजोग्यो’ च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. याच दरम्यान एका मुलाखतीत प्रोसेनजीत चॅटर्जी यांनी ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोरशी (Sharmila Tagore) संबंधित एक किस्सा शेअर केला आहे. प्रोसेनजीत चॅटर्जींनी शर्मिला यांना झापड मारली होती, यामागचं कारण काय होतं तेही त्यांनी सांगितलं आहे.
वडील बिस्वजीत चॅटर्जी यांच्याबरोबर प्रोसेनजीत लहानपणी सेटवर जायचे. तेव्हाची एक आठवण सांगत प्रोसेनजीत म्हणाले, “मला वाटतं तेव्हा मी चार-पाच वर्षांचा असेन. हिरो व हिरोईन यांच्यातील भावनिक सीन सुरू होता, त्या सीनमध्ये शर्मिला आंटींनी माझ्या वडिलांना झापड मारली होती.”
प्रोसेनजीत यांनी सांगितली जुनी आठवण
पुढे लंच ब्रेक दरम्यान शर्मिला टागोर यांनी आपल्याला बोलावलं आणि मांडीवर बसवलं तो प्रसंग सांगत प्रोसेनजीत म्हणाले, “त्यांनी मला हाक मारली व जवळ बोलावलं आणि मी त्यांना झापड मारली.” हा प्रसंग सांगत प्रोसेनजीत हसू लागले. “आजही जेव्हा मी शर्मिला टागोर यांना भेटतो तेव्हा त्या मला त्या प्रसंगाची आठवण करून देतात. ‘मी तुझ्या वडिलांना झापड मारली म्हणून तू मला झापड मारली होतीस ना,’ असं त्या म्हणतात,” असं प्रोसेनजीत म्हणाले.
शर्मिला टागोर आणि विश्वजित चॅटर्जी यांनी ‘प्रभातार रंग’ आणि ‘ये रात फिर ना आएगी’ या दोन चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं. विश्वजित हे दिग्गज अभिनेते आहेत. ७० च्या दशकात ते आघाडीचे अभिनेते होते. आता ८७ वर्षांचे असलेले विश्वजीत यांनी करिअरमध्ये १३० हून जास्त चित्रपट केले आहेत, इतकंच नाही तर त्यांनी काही चित्रपटांचे दिग्दर्शनही केले होते.
प्रोसेनजीत चॅटर्जी-रितुपर्णा सेनगुप्ता यांचा ५० वा चित्रपट
दरम्यान, प्रोसेनजीत चॅटर्जींच्या ‘अजोग्यो’ या चित्रपटाबद्दल बोलायचं झाल्यास रितुपर्णा सेनगुप्ताबरोबरचा हा त्यांचा ५० वा चित्रपट आहे. सुचित्रा सेन आणि उत्तम कुमार यांच्याप्रमाणेच प्रसेनजीत आणि रितुपर्णा सेनगुप्ता यांची जोडी बंगाली सिनेसृष्टीत खूप लोकप्रिय आहे. १९६८ मध्ये ‘छोटो जिग्यासा’ या चित्रपटातून प्रोसेनजीत यांनी बालकलाकार म्हणून काम करायला सुरुवात केली होती. यानंतर, त्यांनी १९८३ मध्ये ‘दुती पता’ या चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली. आज ते बंगाली चित्रपटसृष्टीतील टॉप आणि सर्वाधिक मानधन घेणाऱ्या स्टार्सपैकी एक आहेत.