Raj Kapoor Vyjayanthimala Affair: राज कपूर हे लोकप्रिय अभिनेते-दिग्दर्शक होते, त्यांनी भारतीय सिनेमात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांचे चित्रपट आजही सिनेरसिकांचे मनोरंजन करतात. राज कपूर यांच्या चित्रपटांइतकीच चर्चा त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची झाली. राज कपूर यांचे कृष्णा कपूर यांच्याशी लग्न झाले होते. लग्नानंतरही त्यांची काही अभिनेत्रींशी अफेअर्स होती. राज कपूर यांचे दिवंगत सुपूत्र ऋषी कपूर यांनी त्यांच्या ‘खुल्लम खुल्ला’ या पुस्तकात काही घटनांचा उल्लेख केला होता. यात त्यांनी वडील राज कपूर यांचे वैजयंतीमाला यांच्याशी अफेअर असताना आईने काय केलं होतं ते सांगितलं होतं.
“माझ्या वडिलांचे नर्गिस जींशी (Raj Kapoor Nargis Affair) अफेअर होते तेव्हा मी खूप लहान होतो आणि त्यामुळे त्याचा माझ्यावर काहीही परिणाम झाला नाही. मलाही त्यामुळे घरात काही घडल्याचं आठवत नाही. पण मला आठवतं की बाबांचे वैजयंतीमाला यांच्याशी अफेअर होते, तेव्हा मी आईबरोबर मरीन ड्राईव्हवरील नटराज हॉटेलमध्ये शिफ्ट झालो होतो,” असं ऋषी कपूर यांनी या पुस्तकात लिहिलं आहे. “माझ्या आईने यावेळी माघार न घेण्याचा निर्णय घेतला होता. हॉटेलमधून आम्ही दोन महिन्यांसाठी चित्रकूटमधील एका अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झालो. माझ्या वडिलांनी आई आणि आमच्यासाठी अपार्टमेंट विकत घेतलं होतं. त्यांनी आई परत यावी यासाठी खूप प्रयत्न केले. पण त्यांनी जोपर्यंत आयुष्यातील तो चॅप्टर संपवला नाही, तोवर आईने हार मानली नाही,” असं त्यांनी या पुस्तकात नमूद केलं आहे.
वैजयंतीमाला यांनी या अफेअरच्या गोष्टी फेटाळल्या तेव्हा राग आला होता, असं ऋषी कपूर यांनी या पुस्तकात लिहिलं आहे. “काही वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या एका मुलाखतीत वैजयंतीमाला यांनी माझ्या वडिलांबरोबर कधीच अफेअर नव्हतं असा दावा केला होता. माझ्या वडिलांना प्रसिद्धीची भूक होती, त्यामुळे या गोष्टी पसरवल्या असंही त्या म्हणाल्या होत्या. मला फार राग आला होता. त्या असं कसं म्हणू शकतात. त्यांना या गोष्टी बोलण्याचा अधिकार नव्हता कारण स्वतःची बाजू मांडण्यासाठी माझे वडील तेव्हा जिवंत नव्हते.”
“माझ्या आयुष्याचे सगळे निर्णय दुसरे घेत होते आणि मला…”, अभिजीत सावंतने बोलून दाखवली खंत
ऋषी कपूर यांनी पुस्तकात लिहिलंय की जेव्हा वैजयंतीमाला यांचे पुस्तक प्रसिद्ध झाले तेव्हा अनेकांनी त्यांना त्यांची प्रतिक्रिया विचारली होती. “काळानुसार माझा राग कमी झाला आहे. काही कारणास्तव लोक अनावश्यक तथ्यांवर लक्ष केंद्रीत करतात, हे सत्य मी स्वीकारलंय. पण मी पूर्ण खात्रीने सांगू शकतो की जर बाबा हयात असते तर त्यांनी अफेअरची गोष्ट फेटाळली नसती किंवा माझ्या वडिलांना प्रसिद्धीची भूक होती, असं म्हटलं नसतं,” असंही या पुस्तकात ऋषी कपूर यांनी लिहिलंय.
राज कपूर आणि वैजयंतीमाला यांनी सर्वात आधी १९६१ मध्ये आलेल्या ‘नजराना’ चित्रपटात एकत्र काम केले होते. त्यानंतर त्यांनी राज कपूर दिग्दर्शित ‘संगम’मध्ये एकत्र काम केलं होतं, या चित्रपटात राजेंद्र कुमार देखील होते.
© IE Online Media Services (P) Ltd