बॉलिवूडमधील नावाजलेले संगीतकार राहुल देव बर्मन म्हणजेच आर डी बर्मन यांचा आज वाढदिवस आहे. २७ जून १९३९ साली त्यांचा जन्म झाला होता. प्रसिद्ध संगीतकार सचिन देव बर्मन यांचे ते सुपूत्र होते. त्यामुळे त्यांना कुटुंबातूनच संगीताचा वारसा लाभला होता. प्रेमाने लोक त्यांना ‘पंचम दा’ म्हणत. १९६० ते १९९० या तीन दशकांमध्ये आरडी बर्मन यांनी त्यांच्या संगीताच्या जादूने रसिकांना मंत्रमुग्ध केलं. आशा भोसले आणि किशोर कुमार यांच्यासरख्या गायकांना त्यांच्यामुळे यशाचं शिखर गाठता आलं. बर्मन यांनी जवळपास ३३१ सिनेमांना संगीत दिलं होतं.
प्रसिद्ध गायिका आशा भोसले आणि दिग्गज संगीतकार आरडी बर्मन यांची प्रेम कहाणी सर्वश्रूत आहे. आशा भोसले यांनी एका मुलाखतीत, अत्यंत प्रतिभावान असलेल्या आरडी बर्मन यांच्याबरोबरच्या पहिल्या भेटीची आठवण सांगितली. “जाड चष्मा घातलेला सड पातळ तरुण माझ्याजवळ आला व त्याने माझा ऑटोग्राफ मागितला, त्याने माझे मराठी नाट्यसंगीत रेडिओवर ऐकल्याचं सांगितलं होतं,” असं त्या म्हणाल्या.
दोघांची मैत्री वाढत असताना आशाताईंच्या लक्षात आलं की बर्मन यांनी कोलकाता येथील महाविद्यालय सोडलं आहे. बर्मन यांच्या भवितव्याबद्दल चिंतित झालेल्या आशाताईंनी त्यांना शिक्षण पूर्ण करण्यास सांगितलं. “त्याने कोलकात्यातील कॉलेज सोडलं होतं. मी त्याला ग्रॅज्युएशन पूर्ण करायला हवं होतं, असं सांगितलं. त्यानंतर बाकीच्या रेकॉर्डिंगसाठी तो माझ्याबरोबर रुसला होता,” असं त्या म्हणाल्या.
१९६६ मध्ये बर्मन यांनी रीटा पटेलशी लग्न केले, परंतु पाच वर्षात त्यांचा घटस्फोट झाला. १९८० मध्ये त्यांनी आशा भोसले यांच्याशी लग्नगाठ बांधली. आशाताईंनी बर्मन यांच्या विनोदी स्वभावाचा किस्सा सांगितला. बर्मन यांनी एकदा झाडू आणि गुलाबाचं फूट भेट म्हणून दिले होते, असं त्यांनी सांगितलं. “एक वेळ तो आनंदाने खाली जमिनीवर झोपेल, परंतु त्याची रेकॉर्डिंग सिस्टीम, त्याचा स्टिरिओ नीट ठेवलेला असायचा. तो काय खातो याची त्याला पर्वा नसायची, कारण तो संगीत जगायचा, खायचा आणि झोपायचा. त्यामुळे, जेव्हा मला हा खरा माणूस सापडला तेव्हा मी निश्चिंत झाले. त्याला त्याच्या संगीताबरोबर राहू दिलं की त्याच्याइतका शांत व काळजी घेणारा पती मी पाहिला नाही. पंचमसोबतचे आयुष्य अगदी शांत होते, हे आता मला समजले आहे,” असं त्या म्हणाल्या.
बर्मन यांना खंडाळ्याला जायचं होतं, असं आशाताई त्यांच्या शेवटच्या क्षणांबद्दल बोलताना म्हणाल्या. “शेवटच्या क्षणी “खूप दुखत आहे” असं तो म्हणाला होता. “तो माझे नाव ‘आ..आ..’ घेण्याचा प्रयत्न करत होता, पण शब्द पूर्ण करू शकला नाही.” बर्मन यांना दारू पिण्याच्या सवयीवर मात करता आली असती तर ते जगू शकले असते, असं आशाताईंना वाटतं. बर्मन यांचे ४ जानेवारी १९९४ रोजी वयाच्या ५४ व्या वर्षी मुंबईत निधन झाले होते.