चित्रपटात दिसणाऱ्या काही जोड्या प्रेक्षकांच्या अत्यंत लाडक्या असतात. त्यांना प्रेक्षकांकडून खूपच मोठ्या प्रमाणात पसंती मिळते. राज कपूर – नर्गिस, दिलीप कुमार – वैजंयतीमाला व गुरू दत्त – वहिदा रहमानपासून ते कमल हासन – श्रीदेवी, शाहरूख खान – काजोल व मोहनलाल- शोभना या जोड्या मोठ्या प्रमाणात चर्चेत राहिल्या. मात्र, अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या जोडीची जितकी चर्चा झाली, तितकी चर्चा कोणत्याच जोडीची झाल्याचे पाहायला मिळत नाही.

अमिताभ बच्चन आणि रेखा यांची ऑनस्क्रीन दिसणारी जोडी आणि ते रिलेशनशिपमध्ये असल्याच्या अफवा आजही लक्ष वेधून घेताना दिसतात. महत्त्वाचे म्हणजे गेल्या ४३ वर्षांत त्यांनी कोणत्याही चित्रपटात एकत्र काम केलेले नाही. १९८१ साली प्रदर्शित झालेल्या ‘सिलसिला’ या चित्रपटात त्यांनी एकत्र काम केले होते. त्याबरोबरच त्यांनी १९७६ ला प्रदर्शित झालेला दो अनजाने, ‘आलाप’ (१९७७), ‘मुकद्दर का सिकंदर’ (१९७८), ‘मिस्टर नटवरलाल’ (१९७९)या चित्रपटांत रेखा आणि अमिताभ बच्चन यांनी एकत्र काम केले होते. हे चित्रपट प्रेक्षकांचे आजही आवडते चित्रपट आहेत.

“अमितजींच्या यशात मी योगदान देऊ शकले नाही”

रेखा यांनी २००६ ला फिल्मफेअरला मुलाखत दिली होती. त्यावेळी त्यांनी सांगितले होते, “मी अभिनेत्री म्हणून जी आहे, त्याचं १०० टक्के श्रेय अमिताभ बच्चन यांना जातं. त्यांच्याकडे देण्यासारखं जे काही होतं, ते मी निरीक्षण करून घेतलं आहे. माझ्यावर किंवा इतर कोणाच्या आयुष्यावर त्यांचा किती प्रभाव आहे, याची त्यांना कल्पना नाही. ते माझ्या सदसद्विवेक बुद्धीसारखे आहेत, जे मला माझ्या आयुष्यात आणि अभिनयात मार्गदर्शन करतात.” रेखा यांनी, अभिनयातील शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठ म्हणून अमिताभ बच्चन यांचे वर्णन केले होते. पुढे बोलताना त्यांनी म्हटलेले, “परवाना चित्रपटात योगिता बालीबरोबर त्यांचे काम पाहिल्यानंतर त्यांची माझ्यावर कामाची छाप पडली.”

हेही वाचा: Video: “कमाई…”, असे म्हणत धनंजय पोवारने शेअर केला व्हिडीओ; नेटकरी म्हणाले, “तुमच्या वडिलांच्या चेहऱ्यावर…”

रेखा यांनी म्हटले होते, “सिलसिला या चित्रपटानंतर तुम्ही एकत्र काम का केले नाही, असा प्रश्न चाहते मला पत्राद्वारे विचारतात. मला वाटते की, योग्य संधी मिळाली नाही. कलाकार म्हणून हे माझे नुकसान आहे की, अमितजींच्या यशात मी योगदान देऊ शकले नाही. अमितजींची सहकलाकार होण्यासाठी वाट बघणे, हेच योग्य आहे. सगळे काही योग्य कारणासाठी योग्य वेळेत घडत असते. संयमाचे फळ हे गोड असते, यावर माझा विश्वास आहे. प्रत्येक जण माझ्याइतकाच भाग्यवान असावा; ज्याच्या आयुष्यात रोल मॉडेल म्हणून अमिताभ बच्चन असतील”, असे म्हणत अमिताभ बच्चन यांचा त्यांच्यावर प्रभाव असल्याचे म्हटले होते.