मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाचा सूत्रधार आणि २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार डॉन दाऊद इब्राहिम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दाऊद इब्राहिमला कराचीमध्ये विषबाधा झाल्याची बातमी समोर आल्याने एकच खळबळ माजली. तो रुग्णालयात असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत असंही सांगितलं जात होतं, परंतु या वृत्ताला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. शिवाय आता या सगळ्या अफवा असून दाऊद एकदाम ठणठणीत असल्याचंही सांगितलं जात आहे.
यामुळे दाऊदबद्दल सर्वत्रच चर्चा होताना दिसत आहे. गुन्हेगारी विश्वाप्रमाणेच क्रिकेट आणि मनोरंजन क्षेत्रातही दाऊदचा एकेकाळी चांगलाच दबदबा होता. खासकरून बॉलिवूडवर त्याची चांगलीच पकड होती. कित्येक निर्मात्यांना संरक्षण देणं अन् त्याच्या नावाखाली खंडणी वसूल करणं, कित्येक अभिनेते आणि अभिनेत्री यांना धमकावणं याबरोबरच चित्रपटासाठी आर्थिक सहाय्य करणं अशा वेगवेगळ्या मार्गांनी दाऊद बॉलिवूडवर राज्य करायचा. खासकरून ९० च्या दशकात बॉलिवूडमधील मंडळी आणि दाऊद यांचे संबंध उघडकीस आले होते.
दिवंगत ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर तर यांनी दाऊदला दुबईत भेटल्याचा किस्सादेखील सांगितला होता. यावरून तेव्हा ऋषी कपूर यांना लोकांनी प्रचंड ट्रोलदेखील केलं होतं. आपल्या आत्मचरित्रात ऋषी कपूर यांनी दाऊदच्या भेटीबद्दल खुलासा केला आहे. ऋषी कपूर यांना त्यावेळी शूटिंग करतेवेळी दाऊदने आपल्या घरी चहासाठी बोलावलं होतं इतकंच नव्हे तर दाऊदने त्यांना मदतही देऊ केली होती. त्याबद्दल ऋषी कपूर म्हणतात, “त्याने तेव्हा मला चहापानासाठी बोलावलं होतं, अन् मलादेखील त्यात काहीच गैर वाटलं नव्हतं कारण तो एक फरारी आहे, त्याने कोणालाही इजा पोहोचवली नाही.”
तेव्हा ऋषी कपूर हे ‘डी-डे’ या चित्रपटात दाऊदची भूमिका साकारत होते. ते पात्र जरी काल्पनिक असलं तरी त्याचा संबंध थेट दाऊदशी जोडला जात होता. पुढे ऋषी कपूर म्हणाले, “त्यावेळी तो मला म्हणाला तुम्हाला आणखी कसली किंवा पैशांची गरज असेल तर अगदी मोकळेपणाने मला सांगा.” ऋषी यांनी मात्र दाऊदची मदत घेण्यास नकार दिला.
इतकंच नव्हे तर राज कपूर यांचे निधन झाले तेव्हा त्यांच्या अंत्ययात्रेच्या वेळीसही दाऊदने त्यांच्याकडचा एक माणूस मदतीसाठी पाठवला असल्याचंही ऋषी कपूर यांनी सांगितलं होतं. ऋषी कपूर यांनी हा खुलासा केल्याने तेव्हा चांगलंच वातावरण तापलं होतं, लोकांनी तेव्हा ऋषी कपूर यांच्यावर चांगलीच टीकाही केली होती.