ऐश्वर्या राय ही बच्चन कुटुंबाची सून आहे. तिच्या व अभिषेक बच्चनच्या लग्नाला जवळपास १७ वर्ष झाली आहेत. पण आजही ऐश्वर्या व सलमान खान यांच्या एकेकाळी गाजलेल्या अफेअरची आणि ब्रेकअपची चर्चा होत असते. एकदा मुलाखतीत सलमान खानला ऐश्वर्या रायबद्दल थेट प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नाचं उत्तर त्याने अभिषेक बच्चनचं नाव घेत दिलं होतं.
ऐश्वर्या व अभिषेकच्या लग्नानंतर सलमान खान व ऐश्वर्या कधीच एकमेकांना भेटले नाहीत. पण सलमान बऱ्याचदा अभिषेकला भेटतो, त्याचं अभिषेक व बच्चन कुटुंबाशी चांगलं नातं आहे. कधी, कुठे भेट झाली तर ते एकमेकांना आदराने भेटतात. सलमानने ऐश्वर्याच्या लग्नानंतर तिच्याशी संबंधित एका प्रश्नाचं उत्तर दिलं होतं. त्याने २०१० मध्ये रजत शर्मा यांना दिलेल्या मुलाखतीतील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
‘सलमान खान ऐश्वर्या रायच्या घरी गेला, काच फोडला आणि हाताला जखम करून घेतली, अशा बातम्या आल्या होत्या,’ असा प्रश्न विचारल्यावर सलमान म्हणाला, “आता इतकी वर्षे लोटली आहेत. ती आता कुणाची तरी पत्नी आहे. मला खूप आनंद आहे की तिचं अभिषेक बच्चनशी लग्न झालंय. तिचं लग्न खूप मोठ्या कुटुंबात झालंय, अभिषेक खूप चांगला माणूस आहे आणि ते दोघेही एकमेकांबरोबर आनंदी आहेत. तुमचं एकमेकांबरोबरचं नातं संपल्यानंतर त्या व्यक्तीने दुःखी राहावं, असं कोणत्याही एक्स बॉयफ्रेंडला वाटत नाही. आपल्याशिवाय समोरच्या व्यक्तीने आनंदी राहावं, हीच गोष्ट कोणत्याही एक्स बॉयफ्रेंडला हवी असते,” असं उत्तर सलमान खानने दिलं होतं.
दरम्यान, सलमान खान व ऐश्वर्या राय ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटाच्या शूटिंगवेळी जवळ आले, मग ते एकमेकांच्या प्रेमात पडले. पण त्यानंतर विवेक ओबेरॉयची ऐश्वर्याच्या आयुष्यात एंट्री झाली आणि या दोघांचं नातं संपलं. त्यानंतर ऐश्वर्या व विवेकही वेगळे झाले आणि तिने अभिषेक बच्चनशी लग्न केलं. त्यांना आराध्या नावाची मुलगी आहे.