‘पठाण’मधून दमदार कमबॅक करणाऱ्या शाहरुख खानची सध्या जबरदस्त चर्चा आहे. त्याचे चाहते त्याच्या जुन्या मुलाखतीमधील बऱ्याच गोष्टी सोशल मीडियावर पुन्हा शेअर करत असतात. असाच एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुख खान एक गाणं म्हणून अभिनेत्री प्रियांका चोप्राला लग्नासाठी मागणी घालताना दिसत आहे. शाहरुखने या व्हिडीओमध्ये केलेल्या एका अश्लील कृत्याची चांगलीच चर्चा होत आहे.
हा व्हायरल व्हिडीओ २००९ सालच्या एनडीटीव्हीच्या ‘इंडियन ऑफ द इयर’ या वार्षिक कार्यक्रमादरम्यानचा आहे . त्या वर्षी रणबीर कपूर आणि प्रियांका चोप्राला मनोरंजन उद्योगातून हा पुरस्कार मिळाला होता. काही कारणास्तव प्रियांका या कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित राहू शकली नाही. पण ती व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून या कार्यक्रमाशी जोडली होती. जेव्हा त्याला हा पुरस्कार देण्यात आला तेव्हा शाहरुखने तिच्याशी संवाद साधला अन् थोडी मजा मस्करी केली.
आणखी वाचा : महाभारतावर चित्रपट बनवण्याबद्दल विवेक अग्निहोत्री यांचं मोठं विधान; म्हणाले, “मी यावर गांभीर्याने…”
शाहरुखने प्रथम सांगितले की, त्याला माहित आहे की प्रियांका उत्तम गायिका आहे. पण प्रियांका चोप्राकडून गाणं गाऊन घेता येतील एवढे पैसे त्याच्याकडे नाहीत. यानंतर शाहरुखने बीटल्स या लोकप्रिय रॉक बँडचे लेट इट बी हे गाणे स्वतः गाऊन दाखवले. मग मध्येच त्याने त्याचे शब्द बदलले आणि म्हणाला, “माझ्याशी लग्न कर, माझ्याशी, माझ्याशी लग्न कर”. यानंतर तो प्रियांकाकडे या प्रश्नाचं उत्तर मागतो अन् संपूर्ण कार्यक्रमात एकच हशा पिकतो.
प्रियांकासुद्धा ही गोष्ट मस्करीतच घेते आणि हसत हसत ती शाहरुखला उत्तर देते, “या प्रश्नाचं उत्तर गाण्यातून काय तर शब्दातूनही देणं अवघड आहे.” प्रियांकाचं हे उत्तर ऐकून शाहरुख तिला म्हणतो की, जर ती उत्तर देऊ शकत नसेल तर आपल्या ओठांनी अश्लील हावभाव करूच शकते. त्यानंतर शाहरुख तोंडाने चुंबनाचा आवाज करतो. प्रियांका यावर म्हणते, “राष्ट्रीय टेलिव्हिजनसाठी हे खूप अश्लील आहे.” त्यावेळी ही गोष्ट कुणीच मनावर घेतली नाही, पण आता सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल करून शाहरुखला बदनाम केलं जात आहे असं त्याच्या चाहत्यांचं म्हणणं आहे.