सध्या बॉलिवूड चित्रपटात एखाद्या रॅपरचं गाणं आपल्याला हमखास पाहायला मिळतंच. रॅपविश्वातील लोकप्रिय गायक, संगीतकार आणि रॅपर हनी सिंगपासून ही सुरुवात झाली. हनी सिंगची गाणी सर्वप्रथम बॉलिवूड चित्रपटांत वापरण्यास सुरुवात झाली आणि मग त्याने हळूहळू बॉलिवूडमध्ये स्वतःचं नाव मोठं केलं. बॉलिवूडमध्ये काम मिळाल्याने हनी सिंगचं नाव झालं. हनी सिंग हा इतका लोकप्रिय झाला की खुद्द शाहरुख खानसाठी एक गाणं करायची संधी त्याला मिळाली.

शाहरुख खान, दीपिका पदूकोण यांच्या ‘चेन्नई एक्सप्रेस’ या चित्रपटासाठी हनी सिंगने ‘लुंगी डान्स’ हे सुपरहीट गाणं दिलं. पण तुम्हाला माहितीये की सुरुवातीला हे गाणं शाहरुखला पसंत पडलं नव्हतं. नुकतंच हनी सिंगने याबद्दल खुलासा केला आहे. हे गाणं प्रचंड गाजणार हे हनी सिंगला आधीपासूनच ठाऊक होतं.

आणखी वाचा : ‘बिग बॉस’ फेम प्रिन्स नरुलाच्या कॉन्सर्टमध्ये हाणामारी; दारूच्या नशेत माणसांच्या एका गटाने घातला गोंधळ

एका मुलाखतीमध्ये हनी सिंगने सांगितलं की शाहरुखला सर्वप्रथम ‘अंग्रेजी बीट’च्या धाटणीचं गाणं हवं होतं, पण त्याने याला विरोध केला. याबद्दल बोलताना हनी सिंग म्हणाला, “शाहरुखने अंग्रेजी बीट ऐकून मला फोन केला आणि त्याच्या चित्रपटात त्याला अशाच धाटणीचं गाणं हव असल्याची मागणी केली. मी त्याला नकार दिला, मी त्याला विचारलं की चित्रपटाची कथा आणि नेमका त्याचा फ्लेवर कोणता आहे. त्यानंतर तब्बल ३ तास त्याने मला चित्रपटाबद्दल माहिती दिली. ते एकून मी म्हंटलं की मी यासाठी मी काहीतरी वेगळं तयार करेन आणि जर ते सुपरहीट असेल तरच मी परत येईन. मी ‘लुंगी डान्स’ हे गाणं तयार केलं, पण सर्वप्रथम त्याला ते आवडलं नाही. त्यावर मी म्हणालो की तुम्हाला हवं असेल तर ठीक आहे नाहीतर मी हे गाणं सिंगल म्हणून प्रदर्शित करेन.”

नंतर मात्र हे गाणं जबरदस्त हीट ठरलं. ‘चेन्नई एक्सप्रेस’ या चित्रपटासाठी हे गाणं खूप महत्त्वाचं ठरलं. चित्रपटाच्या शेवटी हे गाणं शाहरुख आणि दीपिकावर चित्रित करण्यात आलं आहे. या चित्रपटाने तर बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केलीच, पण या गाण्यानेसुद्धा चित्रपटाला जबरदस्त फायदा झाला. हे गाणं सुपरस्टार रजनीकांत यांना मानवंदना म्हणून तयार करण्यात आलं असल्याचा खुलासा नंतर शाहरुखने चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान केला.

Story img Loader