२०२३ मध्ये बॉक्स ऑफिसवर तीन चित्रपटांच्या माध्यमातून धुमाकूळ घालणाऱ्या किंग खान शाहरुख खानची जबरदस्त चर्चा होती. शाहरुखचे ‘पठाण’, ‘जवान’ आणि ‘डंकी’ ही तीनही चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजले. ‘डंकी’ बॉक्स ऑफिसवर फार चालला नाही, पण ‘पठाण’ आणि ‘जवान’ या दोन चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला अन् छप्परफाड कमाई केली. चार वर्षांनी शाहरुखने दमदार कमबॅक केला, पण तुम्हाला माहितीये का याच किंग खानने एका ऑस्कर विजेत्या चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता.
या चित्रपटाला एक दोन नव्हे तर तब्बल ८ ऑस्कर पुरस्कार मिळाले. या चित्रपटातील एका महत्त्वाच्या भूमिकेसाठी शाहरुख खानला विचारण्यात आलं होतं पण त्याने त्या भूमिकेला नकार दिला अन् त्यानंतर ही भूमिका बॉलिवूडच्याच आणखी एका मोठ्या स्टारकडे गेली. २००९ साली आलेल्या ‘स्लमडॉग मिलियनेयर’ या चित्रपटासाठीच शाहरुखला विचारणा झाली होती. या चित्रपटात ‘कौन बनेगा करोडपती’सारखाच एक कार्यक्रम दाखवण्यात आला होता ज्याच्या सूत्रसंचालकाच्या भूमिकेत शाहरुख खान दिसणार होता. डॅनी बॉयल यांचा हा चित्रपट मुंबईच्या धारावी झोपडपट्टीतील लोकांच्या जीवनावर बेतलेला होता. परंतु शाहरुखने ती भूमिका नाकारली अन् मग अनिल कपूर यांनी ती भूमिका निभावली.
२००७ मध्ये अमिताभ बच्चन यांच्याऐवजी शाहरुख खानने ‘कौन बनेगा करोडपती’ची धुरा सांभाळली होती अन् यामुळेच डॅनी यांनी या भूमिकेसाठी शाहरुख खानला विचारलं होतं. पण पूर्ण गोष्ट ऐकल्यानंतर शाहरुखने ही भूमिका करायला नकार दिला होता. २०१० मध्ये ‘माय नेम ईज खान’ या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान अमेरिकेतील एका चॅट शोमध्ये शाहरुखने ही भूमिका नाकारण्यामागील कारण सांगितले.
शाहरुख म्हणाला, “मी खूप उत्सुक होतो, अशा प्रकारचा हटके चित्रपट बनणार होता. मी तो चित्रपट केला नाही कारण त्यातील तो सूत्रसंचालक चीटिंग करताना दाखवला आहे अन् तो थोडा स्वार्थीदेखील आहे. मी त्या खऱ्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आहे, त्यामुळे मी जर ही भूमिका केली असती तर लोकांना वाटलं असतं की मी खऱ्या शोमध्येसुद्धा असाच वागतो म्हणूनच मी याला नकार दिला. ‘स्लमडॉग मिलियनेयर’ एक उत्कृष्ट चित्रपट आहे यात काहीच शंका नाही.”
त्यावर्षी ‘स्लमडॉग मिलियनेयर’ची जबरदस्त चर्चा होती. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगली कमाई केलीच पण पुरस्कारांमध्येदेखील हा चित्रपट सर्वश्रेष्ठ ठरला. त्यावर्षी या चित्रपटाने उत्कृष्ट दिग्दर्शक, उत्कृष्ट चित्रपट, उत्कृष्ट गाणे असे एकूण मिळून ८ ऑस्कर पुरस्कार पटकावले. हा चित्रपट थोडा वादाच्या भोवऱ्यातही अडकला होता. भारतातील गरीबीचं चित्रण चुकीच्या पद्धतीने केल्याचा आरोप बऱ्याच लोकांनी याच्या निर्मात्यांवर केला होता.