बॉलिवूडचा बादशाह म्हणजेच किंग खान शाहरुख खान सध्या चांगलाच चर्चेत आहे. ‘पठाण’सारखा सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर ‘जवान’मधून तो प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. शाहरुख हा त्याच्या चाहत्यांशी जोडलेला असतो. सोशल मीडियावर चाहते त्याचे जुने व्हिडीओज, मुलाखती शेअर करत असतात. अशीच एक जुनी व्हिडीओ क्लिप सध्या चर्चेत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ही व्हिडीओ क्लिप ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमादरम्यानची आहे. अमिताभ बच्चन यांच्या या कार्यक्रमात काही वर्षांपूर्वी शाहरुखने पाहुणा म्हणून हजेरी लावली होती. त्यावेळी शाहरुखने तो बरीच वर्षं काश्मीरला जाणं का टाळत होता याबद्दल खुलासा केला आहे. यासाठी त्याचे वडील कारणीभूत होते हे खुद्द शाहरुखनेच स्पष्ट केलं.

आणखी वाचा : आध्यात्मिक गुरूंच्या आश्रमात रजनीकांत यांनी लावली हजेरी; ‘जेलर’च्या अभूतपूर्व यशावर केलं भाष्य

या व्हिडीओमध्ये शाहरुख म्हणाला, “मला माझ्या वडिलांनी सांगितलेलं की आयुष्यात तीन ठिकाणी नक्की भेट दे. एक म्हणजे इस्तानबुल, दुसरं ठिकाण म्हणजे पॅरिस आणि तिसरं ठिकाण म्हणजे काश्मीर. बाकीच्या दोन ठिकाणांबद्दल नव्हे पण माझ्या वडिलांना काश्मीरबद्दल फार अप्रूप होतं. काश्मीर तू माझ्याबरोबर बघ असं ते मला तेव्हा म्हणाले होते. त्यानंतर फार लवकरच त्यांचं निधन झालं. यामुळेच मी पुढील कित्येक वर्षं काश्मीरला जायची संधी मिळाली असूनसुद्धा गेलो नाही. माझ्या मित्रांनी मला बोलावलं, माझं कुटुंबीयही तिथे फिरायला गेले पण मी गेलो नाही.”

या व्हिडीओवर लोकांनी शाहरुखला भरपुर ट्रोलही केलं. तो खोटं सांगत आहे असंही काही लोकांनी दावा केला, पण शाहरुख आजतागायत काश्मीरला गेलाच नाही असं नाहीये. याच व्हिडीओमध्ये त्याने ही गोष्ट स्पष्ट केली आहे. यश चोप्रा यांच्या एका चित्रपटाखातर तो प्रथम काश्मीरला गेला. यश चोप्रा यांना शाहरुख वडिलच मानायचा म्हणूनच शाहरुखने प्रथम काश्मीर यश चोप्रा यांच्याबरोबर पाहिलं. ‘जवान’नंतर येणाऱ्या शाहरुखच्या ‘डंकी’ या चित्रपटाचंही काही चित्रीकरण काश्मीरमध्ये झालं आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन राजकुमार हिरानी करत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When shahrukh khan told why he never went to kashmir for soo long avn
Show comments