जगभरातील अनेक जण कर्करोगाचा सामना करतात. या आजाराबाबत सध्या खुलेपणाने बोलले जात आहे. अनेक जण त्यांचा स्वत:चा प्रवास इतरांशी शेअर करताना दिसतात. त्यामुळे जे कर्करोगाचा सामना करत आहेत, त्यांना प्रेरणा मिळते. मनोरंजनविश्वातील अनेक कलाकारदेखील यावर व्यक्त होताना दिसतात. काही दिवसांपूर्वीच आयुषमान खुरानाच्या पत्नीला दुसऱ्यांदा स्तनाचा कर्करोग झाल्याची माहिती समोर आली होती. याआधी हिना खाननेदेखील वेळोवेळी तिच्या कर्करोगाबाबत माहिती चाहत्यांशी शेअर केली आहे. ती ज्या पद्धतीने या सगळ्याला सामोरी जात आहे, ते पाहून चाहते तिचे कौतुक करताना दिसतात. केमोथेरपीदरम्यान रुग्णांना केसगळतीचा सामना करावा लागतो. बॉलीवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे(Sonali Bendre)देखील यामधून गेली आहे. अभिनेत्रीला मेटास्टॅटिक कर्करोगाचे निदान झाले होते. त्यानंतर तिने परदेशात या आजाराचे उपचार घेतले होते. ज्यावेळी ती भारतात आली, त्यावेळी तिने टक्कल केले होते. अशा अवस्थेत विमानतळावर पापाराझींचा सामना करण्याबद्दल अभिनेत्रीने वक्तव्य केले होते.

जर तुम्ही तुम्हाला आहे तसे…

सोनाली बेंद्रेने २०२४ मध्ये करीना कपूर खानशी संवाद साधला. त्यावेळी सोनाली म्हणाली होती, “जेव्हा मी भारतात आले, त्यावेळी माझ्याकडे विग होतं आणि ते डोक्याला लावायचं असा मी विचार केला होता. पण, त्या प्रवासाने मी खूप थकून गेले होते. व्हीलचेअरवर बसणे कठीण झाले होते. मी तो विग काढला. तो घालायचा नाही असं ठरवलं. टक्कलच आहे, ठीक आहे, काही हरकत नाही, अशी स्वत:ची समजूत घातली.”

तो प्रसंग खूप कठीण होता, हे सांगत अभिनेत्री म्हणाली होती, “लोकांनी तुम्हाला काम करताना पाहिलेलं असतं आणि काम हे दिसण्याशी निगडीत असतं. तो क्षण माझ्यासाठी खूप कठीण होता, पण हे मला सांगायला आवडेल की तिथे जे पापाराझी होते, ते खूप शांत होते आणि ते माझ्याशी खूप प्रेमाने वागले. पापाराझींची ती बाजू मी कधीच पाहिली नव्हती. मला थोडे आश्चर्य वाटले. ते बघून मला आनंद झाला. त्या सगळ्यामुळे याची जाणीव झाली की जर तुम्ही तुम्हाला आहे तसे स्वीकारले तर लोकही तुम्हाला तुम्ही जसे आहात तसे स्वीकारतात.”

बॉलीवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रेने ‘आग’, ‘अंगारे’, ‘रक्षक’, ‘गद्दार’, ‘द डॉन’, ‘हम साथ साथ है’ अशा अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. तसेच अनेक रिअॅलिटी शोचे परीक्षक म्हणूनही काम केले आहे.