सुश्मिता सेनने कमी वयातच मुली दत्तक घेतल्या होत्या. अद्याप अविवाहित असलेल्या सुश्मिताने सांगितलं की मिस युनिव्हर्स स्पर्धा जिंकल्यापासून ती आई होण्यासाठी तयार होती. मिस युनिव्हर्समधील कर्तव्याचा एक भाग म्हणून तिला अनाथाश्रमांना भेट द्यायची होती. या भेटींमध्ये तिच्यातील काही गोष्टी बदलू लागल्या.
सुश्मिता म्हणाली, “या भेटीत एक भावनिक बंध निर्माण होत होते. मी विचार करत होते की केवढी मोठी दरी आहे, कुणालातरी आई व्हायचं आहे आणि एक मूल आहे ज्याला आई हवी आहे. हे सगळं सोपं का होऊ शकत नाही. माझ्या अनेक वर्षांच्या प्रवासाचा आणि मुलांभोवती असण्याचा खूप मोठा परिणाम झाला आणि मला कळलं की मी आई होण्यासाठी तयार आहे.”
“दोघांचं लव्ह मॅरेज होतं, पण दुर्दैवाने…”, पालकांच्या लग्नाबद्दल लेक गश्मीर महाजनीचा खुलासा
सुश्मिताने मूल दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय तिच्या आईला पटला नाही. तिची आई चिडली होती, इतक्या लहान वयात सुश्मिताला मूल का दत्तक घ्यायचं आहे हे तिच्या आईला समजत नव्हतं. सुश्मिताला दोन दत्तक मुली आहेत, ती ३० वर्षांची असताना तिने रिनीला दत्तक घेतलं. सुष्मिताने सांगितलं की तिच्या वडिलांनीच तिला पाठिंबा दिला आणि कायद्याचा भाग म्हणून त्यांनी रिनीच्या नावावर आपली पूर्ण संपत्ती केली.
“माझी आई म्हणाली, ‘तू स्वतः एक मूल आहेस! काय बोलत आहेस, काय झालंय या मुलीला!’ ती माझ्यावर चिडली. माझे वडील खूप सहनशील होते. त्यांनी मला हे करण्यामागचं कारण विचारलं आणि मला खूप स्ट्राँग फिलींग असल्याने मूल दत्तक घ्यायचंय असं मी सांगितलं. ते म्हणाले की तू हे काही वर्षांनीही करू शकशील. मी म्हणाले, ‘जर मी लग्न केलं आणि कोणी बाळासाठी नाही म्हटलं तर लग्न मोडेल, कारण हा माझा कॉल आहे. त्यामुळे मला आधी बाळ दत्तक घेऊ द्या, जेणेकरून कोणीही मला प्रश्न विचारणार नाही.’ माझे वडील हसले आणि माझ्या निर्णयाला पाठिंबा दिला.
“वडिलांच्या पाठिंब्यानेच कोर्टाने मला रिनी दिली. त्यांच्याशिवाय मी हे करू शकलेच नसते. भारतीय व्यवस्था फारच पर्टिक्युलर आहे, जर वडील नसतील तर वडीलधारं कुणीतरी हवं आणि त्यासाठी तुमच्या स्वतःच्या वडिलांपेक्षा चांगला माणूस नाही. कायदा म्हणतो की वडिलांनी त्यांची अर्धी संपत्ती मुलाच्या नावे करणे आवश्यक आहे. पण माझ्या वडिलांनी त्यांची सर्व संपत्ती माझ्या दत्तक मुलीच्या नावावर केली. भारतासारख्या देशात अशा वडिलांच्या पोटी मी जन्माला आले त्याचा मला अभिमान आहे. त्यांनी जे केलं ते अविश्वसनीय आहे,” असं सुश्मिता सेन म्हणाली.