गायक उदित नारायण त्यांच्या एका व्हिडीओमुळे टीकेचे धनी ठरले आहेत. उदित यांनी लाइव्ह कार्यक्रमात सेल्फीसाठी आलेल्या महिला चाहतींच्या ओठांचे चुंबन घेतले. यानंतर त्यांच्यावर टीकेचा भडीमार होत आहे. पण यापूर्वीही उदित एकदा वादात सापडले होते. तेव्हा त्यांनी भर मंचावर गायिका श्रेया घोषालला किस केलं होतं.

श्रेया घोषलने ‘जब तक है जान’ या सिनेमातील ‘सांस में तेरी सांस मिली तो…’ हे गाणं गायक मोहित चौहानबरोबर गायलं होतं. हे गाणं त्यावर्षीच्या सर्वाधिक गाजलेल्या गाण्यांपैकी एक होतं. या गाण्याला अनेक अवॉर्ड्सही मिळाले होते. अशाच एका अवॉर्ड सोहळ्यात सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा अवॉर्ड देण्यासाठी उदित नारायण व मलायका अरोरा मंचावर आले होते. हा अवॉर्ड श्रेया घोषालला मिळतोय, अशी घोषणा मलायकाने केली. त्यानंतर श्रेया अवॉर्ड घ्यायला मंचावर आली.

मंचावर आल्यावर श्रेयाने उदित नारायण यांची गळाभेट घेतली. तेव्हा उदित यांनी श्रेयाच्या गालावर किस केलं होतं. श्रेयाला उदित असं काही करतील अशी अजिबात अपेक्षा नव्हती, त्यामुळे त्यांनी तिच्या गालावर किस केल्यावर तिच्या चेहऱ्यावरील हावभाव बदलतात. त्यानंतर ती मलायकाची गळाभेट घेते आणि अवॉर्ड स्वीकारते. मग उदित नारायण म्हणतात, “श्रेया बोलण्याआधी मी एक गोष्ट सांगू इच्छितो की मी तिच्यासाठी खूप लकी आहे. देवदासमध्ये तिने माझ्याबरोबर गाणं गायलं आणि खूप लोकप्रिय झाली. ती माझ्याही पुढे निघून गेली.”

पाहा व्हिडीओ –

उदित नारायण यांचा श्रेयाबरोबरचा हा व्हिडीओही खूप व्हायरल झाला होता. आज उदित यांचा महिला चाहत्यांना किस करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यांचा श्रेयाबरोबरचा हा व्हिडीओदेखील शेअर केला आहे. उदित नारायण याआधी श्रेयाबरोबरही असेच वागले होते, असंही काही जणांनी त्या व्हिडीओवर कमेंट करून म्हटलं.

दरम्यान, उदित नारायण यांनी चाहतीबरोबरच्या त्या व्हायरल व्हिडीओवर स्पष्टीकरण दिलं आहे. “चाहते खूप वेडे असतात. आम्ही लोक असे नाही. मी सभ्य माणूस आहे. काही लोक या गोष्टी करतात आणि त्याद्वारे आपले प्रेम व्यक्त करतात. पण आता ही गोष्ट व्हायरल करून काय मिळणार? गर्दीत खूप लोक असतात, आमच्यासोबत बॉडीगार्डही असतात, पण चाहत्यांना वाटतं की त्यांना आम्हाला भेटण्याची संधी मिळतेय, म्हणून काही हात मिळवण्याचा प्रयत्न करतात, तर कोणी हाताचं चुंबन घेतं. हे सगळं त्यांचं प्रेम आहे. याकडे फार लक्ष देऊ नये,” असं ते म्हणाले.

Story img Loader