हिंदी चित्रपटातला मैलाचा दगड म्हणजे ‘शोले’. या चित्रपटाने मनोरंजनाच्या व्याख्याच बदलून टाकल्या. हा चित्रपट आजही तितकाच ताजा आहे. यातली गाणी, कथा, प्रत्येक पात्रं लोकांच्या अगदी जवळचं आहे. त्यापैकीच असं अजरामर झालेलं पात्र म्हणजे जेलरचं. ते साकारलं होतं ज्येष्ठ अभिनेते गोवर्धन असरानी यांनी. ‘अंग्रेज के जमाने’ जेलर हे पात्र आजही प्रत्येकाला ठाऊक आहे. असरानी यांनी त्या काळात अशा बऱ्याच छोट्या भूमिका साकारल्या आहेत. तसंच अमिताभ बच्चन, राजेश खन्नासारख्या स्टार्सपासून गोविंदा, शाहरुख खान, अभिषेक बच्चनसारख्या वेगवेगळ्या अभिनेत्यांबरोबर काम केलं आहे.
जेव्हा असरानी हे पुण्याच्या फिल्म इंस्टीट्यूटमधून मुंबईत कामासाठी आले तेव्हा त्यांना कुणीच काम दिलं नव्हतं, याबद्दल त्यांनी एका मुलाखतीमध्ये खुलासा केला. ‘बॉलिवूड ठिकाना’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये असरानी यांना मुंबईत काम मिळवण्यासाठी किती त्रास सहन करावा लागला आणि नंतर यासाठी त्यांनी इंदिरा गांधी यांची कशी मदत घेतली याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.
आणखी वाचा : “राजेश खन्नाला प्रचंड अहंकार…” ज्येष्ठ अभिनेते असरानी यांनी मांडली पहिल्या सुपरस्टारची वेगळीच बाजू
पुण्याच्या ‘FTII’ या संस्थेतून पास होणाऱ्या पहिल्या बॅचमध्ये असरानीदेखील होते, पण जेव्हा ते या संस्थेच्या सर्टिफिकेटवर मुंबईत काम शोधायला गेले तेव्हा मात्र त्यांना हे ध्यानात आलं की बॉलिवूडमध्ये या सर्टिफिकेटला काहीही किंमत नाही. असरानी म्हणाले, “मी माझं सर्टिफिकेट घेऊन बऱ्याच निर्मात्यांचे उंबरे झिजवले, पण मला कुणीच उभं केलं नाही. अभिनयासाठी सर्टिफिकेट महत्त्वाचं नसतं, मोठे स्टार्स हे असं ट्रेनिंग घेताना कधी पाहिलं आहे का? असं म्हणून ते लोक मला हटकायचे.”
आणखी वाचा : ‘लगान’मधील ‘कचरा’ला घेऊन केलेली जाहिरात ‘झोमॅटो’ला पडली महागात; प्रसिद्ध दिग्दर्शकही म्हणाले, “हे अमानवीय…”
पुढे असरानी म्हणाले, “मी तब्बल २ वर्षं कामासाठी धडपड करत होतो. एकेदिवशी इंदिरा गांधी या पुण्यात येणार आहेत अशी बातमी मला समजली. त्या तेव्हा माहिती आणि सूचना प्रसारण मंत्री होत्या. तेव्हा मी माझ्याबरोबरचया इतर काही लोकांनी त्यांच्याकडे जाऊन तक्रार केली. आमच्याकडे सर्टिफिकेट असूनही कुणी आम्हाला काम देत नाही अशी तक्रार आम्ही केली. त्यानंतर त्या मुंबईत आल्या आणि निर्मात्यांना आम्हाला चित्रपटात काम देण्यास सांगितले. त्यानंतर आम्हाला काम मिळणं सुरू झालं. नंतर जया भादूरी आणि मला ‘गुड्डी’ चित्रपटात काम मिळालं. जेव्हा तो चित्रपट हीट झाला तेव्हा ‘FTII’ मधून बाहेर पडणाऱ्या कलाकारांकडे गांभीर्याने बघितलं जाऊ लागलं.”