बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेस्सी सध्या त्याच्या ‘12th fail’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. २७ ऑक्टोबर २०२३ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली होती. या चित्रपटाला यंदाचे बरेच फिल्मफेअर पुरस्कारही मिळाले. सामान्य प्रेक्षकांपासून बऱ्याच सेलिब्रिटीजपर्यंत कित्येकांनी विक्रांतच्या अभिनयाचे आणि त्याच्या या चित्रपटाचे कौतुकही केले. चित्रपटक्षेत्रात येण्याआधी विक्रांतने बऱ्याच टीव्ही सिरियल्समध्ये काम केलं ज्यातून त्याला लोकप्रियता मिळाली.
नुकतंच एका मुलाखतीदरम्यान विक्रांतने त्याच्या या प्रवासाबद्दल भाष्य केलं आहे. या मुलाखतीमध्ये विक्रांतने त्यांच्या जुन्या आठवणी ताज्या केल्या आहेत. याबरोबरच त्याच्या मित्र मंडळींनी त्याला एक धडा शिकवला याबद्दलही विक्रांतने सविस्तर भाष्य केलं आहे. एखाद्या व्यक्तीचा पडका काळ त्याला बऱ्याच गोष्टी शिकवून जातो अन् विक्रांतलाही त्याचा अनुभव आला जो त्याने या मुलाखतीमध्ये शेअर केला आहे.
आणखी वाचा : “मुंबई सोडून जाऊ नकोस…”, जेव्हा मनोज बाजपेयींना महेश भट्ट यांनी दिलेला मोलाचा सल्ला
‘कोईमोई’ने शेअर केलेल्या रीपोर्टनुसार एकेदिवशी विक्रांतने त्याच्या मित्र मंडळींना घरी जेवायला बोलावले होते अन् त्यावेळी विक्रांतची घरची परिस्थिती फारशी काही चांगली नव्हती. एक मध्यमवर्गीय कुटुंबाप्रमाणेच त्याच्या घरची परिस्थिति होती. त्यावेळी त्याने त्याच्या मित्रांना जेव्हा घरी जेवायला बोलावलं तेव्हा त्याच्या याच परिस्थितिबद्दल त्याचे मित्र व्हॉट्सअप ग्रुपवर चर्चा करायचे, गॉसिप करायचे. यानंतर विक्रांतच्या बाबतीतला त्यांचा दृष्टिकोन पूर्ण बदलला होता. याच घटनेविषयी विक्रांतने सविस्तर या मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.
विक्रांत म्हणाला, “मी तेव्हा माझ्या मित्रांना घरी बोलावलं होतं, ते माझे फार घनिष्ट मित्र होते आणि मला त्याचा अभिमान आहे. पण या घटनेतून मला एकप्रकारच्या मानसिकतेविषयी तुम्हाला सांगायचं आहे. माझी आई फार उत्तम जेवण बनवायची अन् यासाठीच मी सगळ्यांना घरी जेवायला आमंत्रित केलं. जेव्हा ते माझ्या घरी आले अन् त्यांनी माझ्या घराची अवस्था पाहिली तेव्हा ते थोडे निराश झाले. आमच्याकडे प्लॅस्टिकच्या खुर्च्या होत्या, भिंतींचा रंग निघत होता, घरच्या छताचे पोपडे पडले होते, स्वयंपाकघरदेखील त्यांच्या मानाने फारसं स्वच्छ नव्हतं हे सगळं पाहून पुढच्या दिवसापासूनच त्यांच्या वागण्यात मला बदल दिसू लागला. ते सगळे त्या दिवशी घरी आले जेवले अन् एका तासातच सगळे तिथून काही ना काही कारण सांगून निघून गेले.”
विक्रांतने ‘धरम-वीर’, ‘बालिका वधू’, आणि ‘कुबुल है’सारख्या सुपरहीट मालिकांमध्ये काम केलं होतं. त्यानंतर त्याने चित्रपट तसेच ओटीटी क्षेत्रातही स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. विक्रांतच्या ‘मिर्जापुर’ आणि ‘क्रिमिनल जस्टिस’ या दोन वेबसीरिज प्रचंड गाजल्या.