विनोद खन्ना यांनी १९८२ साली त्यांच्या करिअरच्या शिखरावर असताना बॉलीवूड सोडून ओशो यांच्या रजनीशपुरम, ओरेगॉन येथील आश्रमात दाखल होण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी ते चित्रपटसृष्टीतील आघाडीचे कलाकार होते आणि त्यांच्या देखण्या व्यक्तिमत्त्वामुळे तसेच अभिनय कौशल्यामुळे ते प्रेक्षकांचे लाडके होते. मात्र, आध्यात्मिक शोध आणि ध्यानसाधनेच्या दिशेने वळणे हे केवळ त्यांचे वैयक्तिक पाऊल नव्हते, तर या निर्णयाचा त्यांच्या कुटुंबावर आणि चाहत्यांवरही मोठा परिणाम झाला.

या काळात अमिताभ बच्चन त्यांच्या करिअरमध्ये झपाट्याने प्रगती करत होते, त्यांनी विनोद खन्ना यांना बॉलीवूडमधील त्यांचं करिअर सोडण्याबाबत पुन्हा एकदा विचार करावा अशी विनंती केली होती. ज्येष्ठ पत्रकार भावना सोमय्या यांनी हिंदी रश यूट्यूब चॅनेलला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, “बच्चन हे एकटे याबाबत काहीच करू शकणार नव्हते ? खन्ना स्वतःच्या विचारात इतके मग्न होते की त्यांनी अखेर ओशो यांच्या आश्रमात जाण्याचा निर्णय घेतलाच.

हेही वाचा…Video : मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत सलमानची अनुपस्थिती, रेखा यांनी केली अर्पिताची विचारपूस; व्हिडीओ झाला व्हायरल

अमिताभ बच्चन यांनी त्यांना विनंती केली असली तरी विनोद खन्ना आपल्या निर्णयावर ठाम होते. त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि बॉलीवूड सोडून आध्यात्मिक प्रवास सुरू करण्याचा निश्चय व्यक्त केला.” सिमी गरेवाल यांना दिलेल्या मुलाखतीत विनोद खन्ना यांनी सांगितले की, “हो, हा निर्णय स्वार्थी आहे; परंतु हा स्वार्थच आहे, जो तुम्हाला स्वतःचा शोध घेण्यासाठी आवश्यक आहे. प्रत्येक जण आपला मार्ग स्वतःच शोधत असतो. तुम्ही एकटे या जगात येता आणि एकटेच जाता, तुमच्या प्रवासासाठी तुम्हाला एकटेच असावे लागते.”

हेही वाचा… “…आणि आमचे सूर जुळले…”, अनुपम खेर यांनी सांगितला लग्नाचा किस्सा; म्हणाले…

सोमय्या म्हणतात, “खरंतर, अमिताभ बच्चन यांनी विनोद खन्ना यांना हा निर्णय न घेण्याची विनंती केली होती. शशी कपूर यांनीही त्यांना विचार बदलावा असे सांगितले होते. प्रत्येक कलाकार आणि दिग्दर्शक त्यांना सांगत होते की हा चुकीचा निर्णय असेल, परंतु विनोद खन्ना यांना आपल्या निर्णयावर ठाम विश्वास होता आणि त्यांनी बॉलीवूड सोडले. त्यांनी ओशो यांच्याबरोबर बरीच वर्षे घालवली आणि त्यानंतर परत आले. त्यांचे पुनरागमनही यशस्वी झाले. महेश भट्ट यांनी त्यांना ‘जुर्म’ या चित्रपटाच्या माध्यमातून पुनरागमन करण्याची संधी दिली आणि त्यांच्या करिअरचा नवीन अध्याय सुरू झाला.”

रजनीशपुरममध्ये सुमारे दोन वर्षे घालवल्यानंतर विनोद खन्ना परतले आणि त्यांच्या जीवनातील एका नव्या प्रवासाची सुरुवात झाली.