चित्रपट निर्माते विशाल भारद्वाज व ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह दोघेही चांगले मित्र आहेत. नसीरुद्दीन यांनी विशाल यांच्या अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. ‘मकबूल’, ‘ओमकारा’, ‘सात खून माफ’ असे अनेक चित्रपट त्यांनी केलेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विशाल यांनी एकदा शूटिंगच्या आदल्या दिवशी नसीरुद्दीन यांचं नाक फोडल्याचा खुलासा केला आहे.
‘अनफ़िल्टर्ड विद समदीश’ मुलाखतीत विशाल भारद्वाज यांनी सांगितलं की ते आणि नसीरुद्दीन शाह एक क्रिकेट सामना खेळत होते. तिथे नसीरुद्दीन विकेटकीपर होते तर विशाल गोलंदाजी करत होते. त्यामुळे जेव्हा वेगात गोलंदाजी करायची असेल तेव्हा विशाल नसीरुद्दीन शाहांना सावध करायचे.
विशाल पुढे म्हणाले की नसीरुद्दीन यांना काही कारणामुळे माझा आवाज ऐकू आला नाही. त्यामुळे मी बॉल टाकताच तो नसीरुद्दीन शाहांच्या नाकावर जाऊन आदळला. बॉल लागल्याने नसीरुद्दीन शाह खाली कोसळले आणि खूप रक्तस्त्राव होऊ लागला. त्यामुळे शाह यांचा पांढरा शर्ट रक्ताने माखून लाल झाला होता. त्यानंतर विशाल शाहांना बाहेर घेऊन जात होते, त्यावेळी शाह यांनी विशाल यांना खूप सुनावलं होतं. ते रागात म्हणाले होते, ‘उद्या माझं शूट आहे.’ मग मी त्यांना बर्फ लावला आणि ते बरे झाले.
विशाल पुढे म्हणाले की या घटनेनंतर गुलजार एके दिवशी टेनिस खेळायला गेले होते. तिथे त्यांची भेट नसीरुद्दीन शाह यांचा मुलगा इमादशी झाली. सकाळी अचानक नसीरुद्दीन यांनी मला फोन केला. ‘मला वाटलं की नाक फोडल्याबद्दल ते पुन्हा माझ्यावर ओरडणार आहेत. खरं नसीरुद्दीन माझ्यावर ओरडले पण त्या चुकीसाठी नाही तर गुलजार यांनी इमादचं नाक फोडलं म्हणून.’
विशाल भारद्वाज म्हणाले, ‘नसीरुद्दीन फोनवर म्हणाले तुला आणि गुलजारसाहेबांना काही प्रॉब्लेम आहे का?’ मी विचारलं, ‘काय झालं?’ ते म्हणाले, ‘तुम्ही दोघेही माझ्या कुटुंबाच्या मागे का लागला आहात. गुलजार साहेबांनी एक बॉल टाकून इमादचं नाक फोडलंय,’ त्यांनी हे सांगितल्यानंतर संपूर्ण प्रकार लक्षात आल्याचं विशाल म्हणाले.