सुप्रसिद्ध दिग्दर्शक मणि रत्नम यांच्या ‘युवा’ चित्रपटात विवेक ओबेरॉयची महत्त्वाची भूमिका होती. या चित्रपटाच्या शूटींगदरम्यान विवेकचा पाय मोडला होता. त्याने त्याचा अपघात झाला तेव्हाचा प्रसंग सांगितला आहे. या अपघातात पायाला दुखापत झाल्यावर अजय देवगण व अभिषेक बच्चन यांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं होतं. तसेच विवेकचा अपघात पाहिल्यानंतर दिग्दर्शक मणि रत्नम यांना हृदयविकाराचा झटका आला होता. ‘युवा’ मध्ये विवेक, अजय आणि अभिषेकसह ईशा देओल, करीना कपूर आणि राणी मुखर्जी देखील होते. हा चित्रपट २० वर्षांपूर्वी २००४ मध्ये रिलीज झाला होता.
अभिषेक बच्चन व अजय देवगणने नेलं रुग्णालयात
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याचा दुचाकीवर अपघात झाला होता, त्या दिवसाची आठवण सांगितली. हा अपघात इतका भयंकर होता की विवेकचा पाय तीन ठिकाणी मोडला होता. “त्या संध्याकाळी एका भीषण दुचाकी अपघातात माझा डावा पाय तीन ठिकाणी मोडला होता. एक अतिशय चांगला दिवस त्या अपघातामुळे अचानक वेदनादायी झाला. मला आठवतं की माझा मोठा भाऊ अजय देवगण आणि माझा मित्र अभिषेक माझ्या सोबत होते, तेच मला दवाखान्यात घेऊन गेले होते. मला खूप जास्त त्रास होत होता व माझ्या मोडलेल्या पायातून येणाऱ्या रक्तामुळे मी रक्ताने माखलो होतो,” असं विवेक ओबेरॉय ‘झूम’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.
संजय दत्तने सोडला अक्षय कुमारचा चित्रपट, १५ दिवस शूटिंग करून घेतला काढता पाय; समोर आलं मोठं कारण
मणि रत्नम यांना हृदयविकाराचा झटका
विवेकचा अपघात झाला तो दिवस आणखी एका धक्कादायक घटनेमुळे वाईट ठरला. त्याचं कारण म्हणजे दिग्दर्शक मणि रत्नम यांना या घटनेचा खूप मोठा धक्का बसला. “माझा अपघात पाहिल्यानंतर मणि अण्णांना हृदयविकाराचा झटका आल्याचं मला कळालं. आम्ही दोघे हॉस्पिटलमध्ये बरे होत असताना अभिषेक बच्चन व अजय देवगण सतत माझ्याबरोबर होते. ते दोघेही विनोद करायचे आणि औषधं देऊन माझं मनोबल वाढवायचे,” अशी आठवण विवेक ओबेरॉयने सांगितली.
अपघातातून बरं व्हायला लागले चार महिने
या दुखातपतीतून बरं व्हायला चार महिने लागले होते, असं विवेक ओबेरॉयने सांगितलं. तीन ठिकाणी मोडलेला पाय बरा होत असताना त्याने ‘फना’ आणि आणखी एका गाण्यासाठी शूट केलं होतं. “खूप साऱ्या गुंतागुंतीनंतर चार महिन्यांनी मी सेटवर परतो. मग मी फना आणि इतर गाण्यांचं शूटिंग केलं. शूटिंग करताना चित्रपटाची सगळी टीम माझं मनोबल वाढवत होती,” असं विवेक ओबेरॉयने नमूद केलं.