आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कायम चर्चेत असणारी अभिनेत्री स्वरा भास्कर हिने गुपचुप समाजवादी पार्टीचा नेता फहाद अहमदशी लग्न केल्याची बातमी नुकतीच समोर आली आहे. स्वराने नुकतंच तिच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ आणि रजिस्टर लग्न केल्याचे काही दाखले शेअर करत हि गोड बातमी तिच्या चाहत्यांना दिली. दिलेल्या माहितीनुसार ६ जानेवारी २०२३ लाच या दोघांनी रजिस्टर पद्धतीने लग्न केल्याचं समोर आलं आहे.
राजकारण, सामाजिक मुद्द्यांवर भाष्य करणाऱ्या स्वरा भास्करचं लग्न हे बऱ्याच लोकांसाठी आश्चर्याची गोष्ट आहे. स्वराला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं जातं, पण त्यावर ती बेधडकपणे उत्तरं देत असते. तिच्या लग्नाची बातमी ऐकून सोशल मीडियावर तिचे चाहते आणि चित्रपटसृष्टीतील लोकांनी तिला शुभेच्छा द्यायला सुरुवात केली आहे.
आणखी वाचा : किंग खाननंतर कार्तिक आर्यनचा डंका; ‘पठाण’नंतर ‘शेहजादा’चा टीझर झळकला बुर्ज खलिफावर
कोण आहे फहाद अहमद?
फहाद अहमद हा समाजवादी पार्टीची युवा संघटनेचा मुंबई आणि महाराष्ट्र भागातील अध्यक्ष आहे. १९९२ साली जन्मलेल्या फहादने अलीगढ मुस्लिम युनिव्हार्सिटिमधून शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यानंतर त्याने एमफीलसाठी टाटा इंस्टीट्यूट ऑफ सोशल सायन्स येथे प्रवेश मिळवला. यानंतरच त्याने राजकारणात प्रवेश करत आपल्या राजकीय करिकीर्दीची सुरुवात केली.
२०१७-१८ मध्ये फहाद अहमद हे नाव लोकांना परिचयाचं झालं. तेव्हा त्याने टाटा इंस्टीट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या एससी, एसटी आणि ओबीसी विद्यार्थ्यांची फी वाढवण्याविरुद्ध मोर्चा काढला होता. या मोर्चात तब्बल १००० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. तसेच या मोर्चाला प्रकाश आंबेडकर यांनीदेखील पाठिंबा दर्शवला होता. एवढंच नव्हे तर फहादने सीएए विरोधात मुंबईतही मोर्चा काढला होता.
एवढंच नाही या संस्थेत फहादने एमफीलचं शिक्षण घेतलं तिथूनच त्याने एमफीलची पदवी घेण्यासही नकार दिला होता. असं म्हंटलं जातं की सीएए च्या मोर्चादरम्यानच स्वरा आणि फहादची ओळख झाली होती. स्वराने हटके पद्धतीने सोशल मीडियावर तिच्या लग्नाची बातमी दिली आहे, फहादनेदेखील तिच्या या ट्वीटला उतर दिलं आहे.