मुंबई चित्रपटसृष्टीत देशातील कानाकोपऱ्यांतून लोक स्वप्नं उराशी बाळगून येतात. त्यापैकी काही लोक शाहरुख खान बनतात तर काही कायम स्ट्रगलच करतात. अशाच एका फोटोग्राफरबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. हा फोटोग्राफर खिशात फक्त २५ रुपये घेऊन मुंबईत आला पण आज या क्षेत्रातील बड्या बड्या लोकांमध्ये त्याची ऊठबस असते. तो प्रसिद्ध फोटोग्राफर म्हणजे मुन्ना ठाकूर.
वयाच्या केवळ १५ व्या वर्षी महाराष्ट्राच्या अकोला जिल्ह्यातील गाव सोडून मुन्ना मुंबईत आला तेव्हा त्याच्या खिशात फक्त २५ रुपये होते. त्याला केवळ कॅमेराबद्दल काही गोष्टी ठाऊक होत्या. बिलाल खान नावाच्या एका व्यक्तीने मुन्नाला कॅमेरा वापरण्याचं प्रशिक्षण दिलं. सुरुवातीला त्यांना कुणीच काम दिलं नाही, पोट भरण्यासाठी त्याने रिक्षा चालवली, पेपर टाकण्याचं कामं केलं. याबरोबरच एका फोटो स्टुडिओमध्ये त्याने पार्टटाइम कामही केलं.
मुन्नाने सर्वप्रथम अभिनेता अर्जुन रामपालच्या फोटोशूटच काम केलं. मुन्ना अर्जुनच्या घरी पेपर टाकायच्या तेव्हा अर्जुनच्या घरी काम करणाऱ्या माणसाकरवी त्याने अर्जुनकडे फोटोग्राफीसाठी शब्द टाकायला सांगितलं. इथपासूनच सेलिब्रिटी फोटोग्राफर बनायचा त्याचा प्रवास सुरू झाला. ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुन्ना म्हणाला, “सुरुवातीच्या काळात मी पैशाच्या बाबतीत कधीच विचार केला नाही. माझे फोटो मासिकात छापून यायचे तेच माझ्यासाठी पुरेसं होतं. यानंतर मला एकापाठोपाठ एक प्रोजेक्ट मिळाले.”
अर्जुन रामपालनंतर जॉन अब्राहम, बिपाशा बसू, प्रियांका चोप्रा, लारा दत्ता, दिया मिर्झापासून श्रद्धा कपूर, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा यांच्यासाठी मुन्नाने सेलिब्रिटी फोटोग्राफर म्हणून काम केलं. इतकंच नव्हे तर चित्रपटसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन यांच्याबरोबरही मुन्नाने काम केलं. आज मुन्ना वर्षाला २५ लाख रुपये फोटोग्राफीमधून कमावतो. आयुष्यात आपण एवढ्या मोठ्या लोकांबरोबर काम केलं यासाठी मुन्ना नेहमीच धन्यता मानतो.