शाहरुख खानचा ‘जवान’ जगभरात धुमाकूळ घालत आहे. ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने रग्गड कमाई केली असून या चित्रपटाने जवळपास १० नवे रेकॉर्ड बनवले आहेत. ‘जवान’मधील विक्रम राठोड आणि आझाद ही दोन पात्रं साकारणाऱ्या शाहरुख खानला लोक पसंत करत आहेतच, पण यातील इतर कलाकारांचेही खूप कौतुक होत आहे. असाच एक कलाकार आहे, ज्याच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
हा अभिनेता जाफर सादिक आहे. रजनीकांत यांच्या ‘जेलर’मध्येही तो दिसला होता. शाहरुख खान स्टारर एटलीच्या या चित्रपटात जाफर सादिकने सुधीर नावाची व्यक्तिरेखा साकारली आहे. सुधीर विजय सेतुपतीने साकारलेल्या काली गायकवाड या पात्रासाठी काम करतो, जो शस्त्राचा व्यापारी आहे. जाफर सादिकचे हे पात्र जवानाच्या कथानकात महत्त्वाची भूमिका बजावते.
आणखी वाचा : ‘जवान’च्या ‘त्या’ डायलॉगवर होणाऱ्या राजकारणाबद्दल शाहरुखने केलं वक्तव्य; म्हणाला “देशाच्या भल्यासाठी…”
विजय सेतुपती अन् शाहरुख खान यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करत जाफरने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. जाफरने अभिनय क्षेत्रात तीन वर्षांपूर्वीच पाऊल ठेवलं आहे अन् या छोट्याश्या कारकिर्दीत जाफरने रजनीकांत, शाहरुख खान व कमल हासनसारख्या बड्या स्टार्सबरोबर काम केलं आहे. जाफर सादिक २०२० मध्ये विघ्नेश शिवनच्या ‘पावा कढाईगल’ या लघुपटात दिसला होता.
हाच चित्रपट पाहिल्यानंतर दिग्दर्शक लोकेश कनगराज यांनी त्याला ‘विक्रम’मध्ये महत्त्वाची भूमिका दिल्याचे जाफर सादिक ‘फिल्म कंपेनियन’शी संवाद साधताना सांगितले होते. यामध्ये तो ज्या पद्धतीने लोकांचा कटिंग प्लायर्सच्या सहाय्याने मारत असे, हे पाहून कित्येकांची झोप उडाली होती. या चित्रपटात आधी जाफर सादिकची व्यक्तिरेखा मृत्युमुखी पडणार होती, पण लोकेश कनगराजने ही व्यक्तिरेखा जिवंत ठेवली, आणि त्याला आणखी काम मिळालं.
तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की जाफर सादिक हा अभिनेता नसून एक लोकप्रिय डान्सर आणि कोरिओग्राफर आहे. त्याचे इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनलही डान्सच्या व्हिडिओंनी भरलेले आहे. मोठे झाल्यावर कोरिओग्राफर बनण्याचे जाफर सादिकचे स्वप्न होते. म्हणूनच त्याने नृत्य हा आपला छंद आणि व्यवसाय बनवला पण त्याचे प्रारब्ध त्याला अभिनयाकडे खेचून घेऊन आले.