अभिनेत्री जान्हवी कपूरने प्रेमाची कबुली दिल्यापासून शिखर पहारिया चर्चेत आला आहे. जान्हवी व शिखर मागच्या बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. आधी ते रिलेशनशिपमध्ये होते, काही काळाने त्यांचं ब्रेकअप झालं आणि ते नंतर पुन्हा एकत्र आले. ‘कॉफी विथ करण 8’ मध्ये जान्हवीने तिच्या लव्ह लाइफबद्दल खुलासा केला.
शिखर हा एक प्रोफेशनल पोलो खेळाडू आहे, त्याने २०१३ मध्ये रॉयल जयपूर पोलो टीमचा सदस्य म्हणून भारताचे प्रतिनिधित्व केले होते. पोलो व्यतिरिक्त तो प्रशिक्षित घोडेस्वार आहे. शिखरने अवघ्या १३ वर्षांचा असताना व्यवसाय सुरू केला होता. त्याची कन्सल्टन्सी फर्म आहे. पाळीव प्राण्यांच्या नवीन मालकांना कन्सल्ट करण्याचं काम शिखरची कंपनी करते. त्याने वाधावन ग्लोबल कॅपिटल लंडनमध्ये काम केलं आहे. त्यानंतर त्याने गेमिंग आणि मनोरंजन क्षेत्रात नशीब आजमावले आणि आपल्या मोठ्या भावाबरोबर ‘इंडियानविन’ कंपनी सुरू केली.
‘डीएनए’ ने दिलेल्या वृत्तानुसार, शिखर पहरियाकडे ८४ कोटी रुपयांची मालमत्ता आहे आणि लॅम्बोर्गिनी अॅव्हेंटोरसह लक्झरी कार आहेत. शिखर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू आहे. सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी स्मृती शिंदे आणि संजय पहारिया यांचा तो मुलगा आहे.
दरम्यान, प्रेमाची कबुली दिल्यानंतर जान्हवी कपूरने शिखर पहारियाबरोबर आंध्र प्रदेशमधील तिरुमला येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात जाऊन प्रार्थना केली. तिचा व शिखरचा दर्शनाला जातानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यापूर्वीही ते अनेकदा दर्शनाला व फिरायला एकत्र जाताना दिसले होते.