अभिनेते नाना पाटेकर यांनी त्यांच्या चित्रपटांच्या तसंच नाट्यसृष्टीतल्या कामाबाबत भाष्य केलं आहे. महासागर नाटकात काम कसं मिळालं? मुंबईत आल्यानंतरचं आयुष्य कसं होतं हे सगळं नाना पाटेकरांनी उलगडलं आहे. तसंच आपली आवडती अभिनेत्री कोण ? हे पण सांगितलं आहे.
नाना पाटेकर सिगारेटच्या व्यसनाबाबत काय म्हणाले?
सुरुवातीच्या काळात मी दिवसाला ६० सिगारेट ओढत असे. मला एके दिवशी खूप खोकला झाला. माझ्या बहिणीकडे गेलो होतो. तिच्या मुलाचा आठ दिवसापूर्वीच मृत्यू झाला होता. त्यावेळी मी बहिणीकडे गेलो असताना मला सारखी खोकल्याची उबळ येत होती. त्यावर बहीण मला म्हणाली मी अजून काय काय वाईट बघायचं आहे? ती गोष्ट माझ्या मनाला फार लागली. मी त्यानंतर मुंबईला आलो. त्यादिवशी ठरवलं सिगारेट ओढायची नाही. त्यादिवशी ओढली नाही. त्यानंतर मी सलग पाच दिवस सिगारेट ओढली नाही. बहिणीला फोन करुनही सांगितलं की मी पाच दिवस सिगारेट ओढलेली नाही. त्यावर बहीण मला म्हणाली मी तुला काळजीने सांगितलं होतं. तुला ओढायची असेल तर ओढ पण प्रमाण कमी कर. पण मला त्यानंतर असं वाटलंच नाही. रोज स्वतःला सांगायचो सिगारेट ओढायची नाही. सवय सुटली. आज २० वर्षे झाली आहेत सिगारेट ओढली नाही असं म्हणत नाना पाटेकर यांनी सिगारेट कशी सोडली यावर भाष्य केलं.
तनुश्री दत्ताने केलेले आरोप फेटाळले
तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले होते. २००८ मध्ये आलेल्या ‘हॉर्न ओके प्लीज’ चित्रपटातील एका गाण्याच्या शूटिंगदरम्यान नाना पाटेकर यांनी आपल्याबरोबर गैरवर्तन केलं होतं, असं तनुश्री म्हणाली होती. आता नाना पाटेकर यांनी या मुद्द्यावर आपली बाजू मांडली आहे. तनुश्रीने केलेले सर्व आरोप खोटे असल्याचे ते म्हणाले. तनुश्रीने जे आरोप केले तसं काहीही घडलेलंच नाही असं नाना पाटेकर यांनी सांगितलं. द लल्लन टॉपला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे भाष्य केलं. तसंच आवडती अभिनेत्री कोण? हेदेखील सांगितलं.
आवडती अभिनेत्री कोण?
“हेमा मालिनी या आमच्या काळातल्या आवडत्या अभिनेत्री. हेमा मालिनी खूप आवडायच्या. आजही आवडतात. हेमा मालिनी यांचा प्रभाव होता. हेमा मालिनी यांच्या प्रमाणेच वहिदा रहमानही आवडतात. कमाल अभिनय करत असत. मी माझ्या जिममध्येही सुरैय्यांची गाणी लावतो. मी तल्लीन होऊन गाणी ऐकतो. सुरेंद्र हे सैगलप्रमाणेच गायचे. ते अभिनयही करायचे. मुगल-ए-आझम सिनेमात त्यांनी तानसेनची भूमिका केली होती. बडे गुलाम अली खाँ, भीमसेन जोशी यांची गाणीही मी ऐकतो आहे. यमन कल्याण राग आज मी सकाळीच ऐकला.” असंही नाना पाटेकर यांनी म्हटलं आहे.
© IE Online Media Services (P) Ltd