Who is Naomika Saran: दिवंगत अभिनेते राजेश खन्ना व डिंपल कपाडिया यांच्या दोन्ही मुली ट्विंकल आणि रिंकी खन्ना यांनी चित्रपटसृष्टीत नशीब आजमावले; पण त्यांना फार यश मिळाले नाही. काही चित्रपट केल्यानंतर, ट्विंकल आणि रिंकी या दोघांनीही बॉलीवूडला अलविदा केलं. ट्विंकलने अक्षय कुमारशी लग्न केलं, तसेच तिला पुस्तकांची आवड असल्याने तिने काही पुस्तकं लिहिली. पती इंडस्ट्रीत असल्याने ट्विंकल कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. मात्र, रिंकी खन्ना बॉलीवूडच्या झगमगाटापासून खूप दूर आहे. सध्या रिंकी नाही, पण तिच्या लेकीने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

नाओमिकाने मॅडॉक फिल्म्सच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित पार्टीला तिची आजी डिंपल कपाडियासह हजेरी लावली. या पार्टीत नाओमिकाने तिच्या लुक आणि स्टाइलमुळे लोकांचे लक्ष वेधून घेतले. काळ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये नाओमिका खूपच सुंदर दिसत होती. नाओमिकाने ड्रेससोबत गोल्डन स्टेटमेंट ज्वेलरी, ब्लॅक पर्स आणि ब्लॅक हील्स घातल्या होत्या. तिने केस मोकळे सोडले होते. नाओमिका या लूकमध्ये खूपच सुंदर आणि स्टायलिश दिसत होती.

सोशल मीडियावर नाओमिकाचा आजीबरोबरचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर लोक तिचं कौतुक करत आहेत. ही किती सुंदर दिसते, हिचे डोळे आजोबांसारखे आहेत, अशा कमेंट्स नाओमिकाच्या व्हिडीओवर पाहायला मिळत आहेत.

काय करते रिंकी खन्नाची मुलगी नाओमिका सरन?

रिंकी खन्ना आणि उद्योगपती समीर सरन यांची मुलगी नाओमिका सरन मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर आता लंडनमध्ये उच्च शिक्षण घेत आहे. नाओमिका सरन बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. पीपिंग मून डॉट कॉमच्या एका रिपोर्टनुसार, दिनेश विजन राजेश खन्ना यांची नात नाओमिका सरन हिला बॉलीवूडमध्ये ब्रेक देऊ शकतात. अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा याच्याबरोबर मॅडॉक फिल्म्स बॅनरखाली तयार होणाऱ्या एका रोमँटिक-कॉमेडी चित्रपटात नाओमिकाला लाँच करण्याच्या चर्चा सुरू आहेत.

दरम्यान, नाओमिका सोशल मीडियावर सक्रिय आहे. ती तिचे फोटो व व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचे आई-वडील, मावसभाऊ आरव आहुजा, आजी डिंपल कपाडिया यांच्याबरोबरचे व तिच्या मित्र-मैत्रिणींबरोबरचे फोटो आहेत.