Anushka Sharma on Ranveer Singh: टीव्हीवर दिसणाऱ्या अथवा मोठ्या पडद्यावर दिसणाऱ्या अनेक कलाकारांना पाहिल्यानंतर, स्क्रीनवर दिसणारे त्यांच्यातील बॉण्डिंग पाहिल्यानंतर ते कलाकार खऱ्या आयुष्यातसुद्धा एकत्र असावेत, असे चाहत्यांना वाटत असते. रणवीर सिंह आणि अनुष्का शर्मा ही जोडी अशाच ऑनस्क्रीन जोड्यांपैकी एक आहे.
अनुष्का शर्मा(Anushka Sharma ) व रणवीर सिंह यांनी मनीष शर्माच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटात पहिल्यांदा एकत्र काम केले. या चित्रपटाद्वारे रणवीर सिंहने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. ‘बँड बाजा बारात’ला मोठे यश मिळाले होते. त्यानंतर त्यांनी दिल धडकने दो या चित्रपटातही एकत्र काम केले होते. त्यांची ऑफस्क्रीन मैत्रीदेखील उत्तम आहे. एका जुन्या मुलाखतीत अनुष्काने कधीच रणवीर सिंहला का डेट केले नाही, याबद्दल खुलासा केला होता.
“रणवीर बॉयफ्रेंड होऊ शकत नाही”
बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने २०११ साली एनडीटीव्हीला मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत अनुष्काने रणवीर सिंह बॉयफ्रेंड असू शकत नाही, असे म्हटले होते. त्या मुलाखतीत अनुष्काला असेही विचारले गेले होते की, रणवीर असं का म्हणाला होता की, तो गर्लफ्रेंड म्हणून तुला सांभाळू शकणार नाही. ती तिच्या बॉयफ्रेंडला मारून टाकेल. त्यावर उत्तर देताना अनुष्का शर्मा म्हणाली होती, “रणवीर बॉयफ्रेंड होऊ शकत नाही. तो चांगला मुलगा आहे. खूप मेहनतीसुद्धा आहे. पण, सध्या तो स्वत:मध्ये गुंतलेला आहे, जे त्यानं असलं पाहिजे. हा त्याचा पहिला चित्रपट आहे. तो आताच इंडस्ट्रीमध्ये आला आहे. त्यामुळे त्याचं स्वत:मध्ये गुंतलेलं असणं मी समजू शकते. त्यामुळे मी असं म्हणते की, मी त्याला डेट करू शकत नाही. अनेक लोक मला विचारतात की, आम्ही एकमेकांना डेट का करत नाही. त्यावर मी हे कारण सांगते. मला माझ्या आयुष्यात असा बॉयफ्रेंड पाहिजे, जो दिवसाच्या शेवटी फक्त स्वत:चा दिवस कसा गेला हे सांगणार नाही; तर तो मलाही विचारेल की, तुझा दिवस कसा गेला, जे रणवीर कधीच करणार नाही. त्यामुळे मी त्याला डेट करीत नाही.”
२०१० साली प्रदर्शित झालेल्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटात अनुष्काने श्रुती कक्कर ही भूमिका साकारली होती; तर रणवीर सिंहने बिट्टू ही भूमिका साकारली होती. दोघे व्यावसायाच्या निमित्ताने एकत्र येतात. दिल धडकने दो या चित्रपटातदेखील त्यांनी एकत्र काम केले होते. या चित्रपटात फरहान अख्तर, प्रियांका चोप्रादेखील महत्त्वाच्या भूमिकांत आहेत.
दरम्यान, अनुष्का शर्माने २०१७ मध्ये लोकप्रिय क्रिकेटर विराट कोहलीबरोबर लग्नगाठ बांधली. त्यांना वामिका व अकाय ही मुले आहेत; तर रणवीर सिंहने दीपिका पादुकोणशी २०१८ मध्ये लग्नगाठ बांधली. त्यांना दुआ ही मुलगी आहे. कलाकारांच्या कामाबद्दल बोलायचे, तर अनुष्का याआधी झिरो या चित्रपटात दिसली होती. तर रणवीर सिंह लवकरच ‘डॉन ३’मध्ये दिसणार आहे.