वयाच्या ९१ व्या वर्षी लाखो प्रेक्षकांसमोर आजच्या काळातील लाइव्ह गाणी गाणं ही गोष्ट अजिबातच सोपी नाहीये. पण, दुबईतील कॉन्सर्टमध्ये लाइव्ह सादरीकरण करून गानसम्राज्ञी आशा भोसले यांनी तरुणपिढीसमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या या कॉन्सर्टची सर्वत्र तुफान चर्चा चालू होती. गेली अनेक वर्षे सातत्याने वैविध्यपूर्ण गाणी गाऊन आशा भोसले यांनी प्रेक्षकांच्या हृदयात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. भारतीय चित्रपटसृष्टीला लाभलेल्या या दिग्गज गायिका नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये सहभागी झाल्या होत्या.

आशा भोसले व लता मंगेशकर या दोन बहि‍णींचं नातं सुद्धा खूपच खास होतं. पण, गाणी रेकॉर्ड करताना, व्यावसायिक जगात जेव्हा या दोघींची भेट व्हायची तेव्हा लता दीदी नेहमीच सगळ्या गोष्टींचं व्यावसायिक दृष्टीकोनातून पालन होईल याकडे लक्ष द्यायच्या. उदा. औपचारिक व सौम्य बोलणं… कामाव्यतिरिक्त घरात या बहि‍णींमध्ये मनमोकळेपणाने संवाद व्हायचा. याशिवाय पांढऱ्या साड्या नेसायचं कारणही आशा भोसले यांनी यावेळी सांगितलं.

अमृता राव आणि आरजे अनमोल यांचा पॉडकास्ट ‘कपल ऑफ थिंग्ज’मध्ये आशा भोसले सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्या म्हणाल्या, “मी आणि दीदी याशिवाय आमच्या इतरही बहिणी… त्या काळात आम्ही सगळ्याजणी पांढऱ्या साड्या नेसायचो. आम्हाला असं वाटायचं की, पांढरी साडी आमच्यावर शोभून दिसते. जर रंगीत साड्या नेसल्या, तर आम्ही कदाचित आणखी सावळ्या दिसू असं वाटायचं. त्यामुळेच आम्ही पांढऱ्या साड्या नेसायचो. त्यानंतर मग मी गुलाबी साड्या नेसायला सुरुवात केली. तेव्हा दीदीने डोळ्यांनी एक कटाक्ष दिलेला की, हे कधी झालं? केव्हा झालं? पण, तेव्हापासून मग मी घरात गुलाबी साडी नेसायला सुरुवात केली. कोलकाता येथील साड्या तेव्हा स्वस्त असायच्या, मग तिथल्याच साड्या आम्ही जास्त नेसायचो.

आशा भोसले पुढे म्हणाल्या, “दीदी घरी अगदी सामान्यपणे वागायची. पण, ती माझ्याशी बाहेर खूप औपचारिक आणि सौम्यपणे बोलत असे. घरी आमचं एक वेगळं नातं होतं, आम्ही मराठीत बोलायचो. मात्र, गाण्याच्या बाबतीत आमच्यात कोणतंही नातं नव्हतं. ती बाहेर लता मंगेशकर होती आणि बाहेर तिचा स्वतःचा दर्जा होता.”

दरम्यान, भारतरत्न लता मंगेशकर आणि आशा भोसले या दोघीही भारतीय चित्रपटसृष्टीतील लाभलेल्या दोन दिग्गज गायिका आहेत. २०२२ मध्ये लता मंगेशकर यांचं निधन झालं. भारताची गानकोकिळा म्हणून त्यांना ओळखलं जायचं. मराठी, बंगाली, पंजाबी, संस्कृत, गुजराती अशा अनेक भाषांमध्ये त्यांनी असंख्य गाणी गायली होती.

Story img Loader