सध्या बॉलिवूडपेक्षा दाक्षिणात्य चित्रपटांची चांगलीच चलती आहे. कन्नड चित्रपट ‘कांतारा’ने सध्या बॉक्स ऑफिसवर ४०० कोटीचा आकडा पार केला आहे. प्रेक्षकसुद्धा बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपट यांच्यात तुलना करू लागले आहेत. हिंदी चित्रपटात काम करणारे कलाकारसुद्धा यावर व्यक्त होऊ लागले आहेत.
नुकतंच बॉलिवूड अभिनेते पंकज त्रिपाठी यांनी याविषयी भाष्य केलं आहे. दाक्षिणात्य किंवा इतर भाषेतील चित्रपटात काम करण्यापेक्षा हिंदीत काम करणं जास्त सोयीचं पडतं असं वक्तव्य पंकज यांनी केलं आहे. ‘गँग्स ऑफ वासेपूर’ नंतर पंकज त्रिपाठी यांच्या अभिनयाची प्रेक्षक चांगलंच कौतुक करत आहेत. गोव्यात सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात नुकतीच पंकज यांनी हजेरी लावली.
आणखी वाचा : ‘कांतारा’ने पार केला ४०० कोटी आकडा; वर्षभरात सर्वाधिक कमाई करणारे पहिले ५ चित्रपट दाक्षिणात्यच
या सोहळ्यात पंकज त्रिपाठी यांना दाक्षिणात्य तसेच हॉलिवूड चित्रपटात काम करण्याबद्दल विचारणा झाली. यावर पंकज म्हणाले, “मी स्वतःवर कधीच भाषेचं बंधन लादलं नाही, पण माझी पहिली पसंती ही हिंदी चित्रपटांनाच आहे, कारण यात काम करणं हे माझ्यासाठी जास्त सोयीचं आहे. मला या भाषेतील बारकावे यातील भावना चांगल्या ठाऊक आहेत. हॉलिवूडचं सोडा, पण मला तेलुगू आणि मल्याळम फिल्ममेकर्सकडून बऱ्याच ऑफर आल्या आहेत, पण त्या भाषांमध्ये मी तेवढा पारंगत नसल्याने मी त्या चित्रपटाला तेवढा न्याय देऊ शकणार नाही.”
पंकज यांनी हॉलिवूडस्टार क्रिस हॅम्सवर्थच्या ‘extraction’ या हॉलिवूड चित्रपटात छोटीशी भूमिका केली होती. शिवाय पंकज यांच्या ‘मिर्जापुर’ची सध्या सगळीकडे चर्चा आहे. यातील पंकज यांनी साकारलेली ‘कालीन भैय्या’ ही भूमिका लोकांनी चांगलीच डोक्यावर घेतली. आता याच्या तिसऱ्या सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.