अभिनेता सनी देओल म्हटलं की आपल्याला आठवतो त्याचा ‘ये ढाई किलो का हाथ जिसपे उठता है ना, वो उठता नहीं उठ जाता है.’ हा ‘दामिनी’ मधला अजरामर डायलॉग. जेव्हा त्याच्या बरोबरीचे हिरो हे रुपेरी पडद्यावर रोमान्स करत होते तेव्हा आपली अॅक्शन हिरो ही इमेज त्याने तयार केली. धर्मेंद्र यांचा मोठा मुलगा सनी देओल याला अभिनयाचं बाळकडू घरातच मिळालं कारण वडील इतके मोठे लिजंड असताना त्यांचा मुलगा अभिनेताच होणार हे जवळपास ठरलं होतं, पुढे तेच घडलं. धर्मेंद्र यांची इमेज ‘ही मॅन’ची होती. सनीने ती चार पावलं पुढे नेली. मात्र राग अनावर होणं हा त्याचा स्थायी भाव होता. ‘डर’ सिनेमाच्या वेळी असाच एक प्रसंग घडला ज्यामुळे सनी देओल आणि शाहरुख खान हे एकमेकांशी १६ वर्षे बोलत नव्हते. सनीच्या वाढदिवसानिमित्त आपण जाणून घेणार आहोत हा किस्सा आणि कसं आहे या कलाकाराचं आयुष्य? याचाही आढावा घेणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सनी देओल इतका चिडला होता की…

१९९३ मध्ये ‘डर’ रिलिज झाला. या सिनेमात शाहरुख खान, सनी देओल आणि जुही चावला होते. सनी देओल नायक, जुही चावला नायिका आणि शाहरुख खान जुहीवर एकतर्फी प्रेम करणारा तिचा चाहता. अशी या सिनेमाची स्टोरी होती. या सिनेमात सनी देओलने सुनील मल्होत्रा हे पात्र साकारलं होतं. जो नौदलात कमांडो असतो. तर जुहीने किरण ची भूमिका केली होती. शाहरुख खानचं या सिनेमातलं नाव होतं राहुल मेहरा. जो जुहीवर एकतर्फी प्रेम करत असतो. एक विकृत प्रियकर काय काय करेल? ते सगळं यात तो करताना दाखवला आहे. या सिनेमात जो क्लायमॅक्सचा प्रसंग आहे त्यात शाहरुख खान आणि सनी देओल यांची मारामारी होते. ज्यात शाहरुख खान सनी देओलला चाकू मारतो आणि सनी देओल खाली पडतो असा प्रसंग होता. सनी देओल याच प्रसंगावरुन चिडला होता.

काय घडलं ‘डर’च्या सेटवर?

यश चोप्रा हे ‘डर’ सिनेमाचे दिग्दर्शक होते. त्यांनी हा प्रसंग सनी देओलला सांगितला. त्यावेळी सनी देओल त्यांना हे समजावून सांगत होता की मी सिनेमात एक नौदल अधिकाऱ्याची भूमिका करतो आहे. तो एखाद्या रोडरोमिओच्या हल्ल्यात कसा काय खाली पडेल? उलट तो कुठल्याही रोडरोमिओ पेक्षा जास्त शक्तीशाली असेल. मात्र यश चोप्रांनी काही सनीचं ऐकलं नाही. सनी शेवटी शांत झाला. तो त्याच्या जीन्सच्या दोन्ही खिशात हात घालून उभा होता. यश चोप्रांनी सगळा सीन सांगितला तेव्हा सनी देओल इतका चिडला होता की त्याच्या जीन्सचे दोन्ही खिसे त्याने फाडले. तो बोलला काहीच नाही मात्र हा प्रसंग बघणारे सगळेच घाबरले. शाहरुखही तिथेच होता, त्यालाही हा प्रसंग अनपेक्षित होता. सिनेमात प्रसंग चित्रीत झाला. सिनेमा रिलिज झाला आणि हिटही झाला. पण सनी देओल यश चोप्रांवर नाराज झाला. त्याने परत कधीही यश चोप्रांबरोबर काम केलं नाही.

डर सिनेमातला सुप्रसिद्ध चेसिंग सीन (फोटो-फेसबुक )

शाहरुखशी १६ वर्षांचा अबोला

‘डर’ सिनेमानंतर सनी देओल आणि शाहरुख खान या दोघांमध्ये एक दोन नाही १६ वर्षे अबोला होता. सनी देओल सिनेमाचा हिरो आणि शाहरुख खान हा अँटी हिरो होता. ‘डर’ प्रदर्शित झाल्यानंतर सगळी वाहवा झाली ती शाहरुखच्या भूमिकेची. जी गोष्ट सनी देओलला मुळीच रुचली नाही. त्यामुळे शाहरुख बरोबर सनीने किंवा सनी बरोबर शाहरुखने भविष्यात काम केलं नाहीच शिवाय १६ वर्षे ते एकमेकांशी बोललेही नाहीत. या दोघांमध्ये खूप मोठं भांडण झाल्याच्या चर्चाही तेव्हा रंगल्या होत्या. मात्र या दोघांनीही त्यावर कधीच भाष्य केलं नाही. पुढे शाहरुख खान हा यशराज बॅनरचा हिरो झाला आणि सनी देओल त्याच्या वाटेने वाटचाल करत राहिला. मात्र दोघांमध्ये शीतयुद्ध राहिलं जे काही मिटायला १६ वर्षे गेली. तसंच नुकतंच गदर २ आणि जवानच्या यशानिमित्तही दोघांनी एकमेकांचं अभिनंदन केलं. त्यावेळेलाही हे दोघं एकत्र दिसले होते.

‘बेताब’ मधून सिनेसृष्टीत पदार्पण

सिनेमात अॅक्शन हिरोची इमेज निर्माण करणाऱ्या सनी देओलची सुरुवात ‘बेताब’ या सिनेमातून झाली. इंग्लंडमध्ये अभिनयाचं प्रशिक्षण घेतल्यानंतर सनी देओल भारतात परतला आणि त्याने हा सिनेमा केला. त्यानंतर त्याने ‘सोनी महिवाल’, ‘अर्जुन’, ‘समुंदर’ ,’डकैत’, ‘पाप की दुनिया’, ‘यतीम’, ‘त्रिदेव’, ‘चालबाज’ अशा चित्रपटांमधूनही अभिनय केला. मात्र त्याच्या कारकिर्दीला खऱ्या अर्थाने ब्रेक मिळाला तो ‘घायल’ या सिनेमामुळे. ‘घायल’चा हिरो सनी देओल होता. ‘बलंवत राय’ला (अमरिश पुरी) आव्हान देणारा, २४ तासांत तुला संपवेन म्हणणारा त्याचा अंदाज लोकांना चांगलाच भावला. राज बब्बरने या सिनेमात सनीच्या मोठ्या भावाची भूमिका केली होती. अमरिश पुरी त्याला चुकीच्या आरोपांमध्ये अडकवतो आणि शेवटी त्याचा त्यात मृत्यू होतो. ज्यानंतर अजय मेहरा (सनी देओल) अमरिश पुरीचा सूड घेतो अशी ही कथा होती. सनी देओलचा अभिनय, त्याची ती डरकाळी सगळ्यांनाच आवडली. अन्याय झालेला तरुण काय करु शकतो? यावर ‘घायल’मध्ये भाष्य करण्यात आलं होतं. त्यावेळच्या पिढीला जे वाटत होतं की हे आपण केलं पाहिजे ते सनी देओल पडद्यावर साकरत होता. घायलचं यश इतकं मोठं होतं की फिल्मफेअरची सात नामांकनं या सिनेमाला मिळाली. तसंच सनी देओलला या भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. घायल सिनेमाचा तमिळ, तेलगू आणि कन्नड भाषेत रिमेकही केला गेला. या सिनेमाचा सिक्वल ‘घायल वन्स अगेन’ हा सिनेमा २७ वर्षांनी म्हणजेच २०१६ मध्ये आला होता. तो फारसा चालला नाही मात्र ‘घायल’ आजही पाहिला तरी त्या सिनेमाने प्रेक्षकांवर काय गारुड केलं असेल हे कळतं.

( सनी देओल )

‘घायल’ ठरला टर्निंग पॉईंट

‘घायल’नंतर सनी देओलने मागे वळून पाहिलंच नाही. ‘नरसिंहा’, ‘घातक’, ‘दामिनी’ ,’जीत’, ‘जिद्दी’, ‘बॉर्डर’, ‘जोर’, ‘अर्जुन पंडित’, ‘गदर एक प्रेमकथा’, असे एकाहून एक सरस चित्रपट सनी देओल करत गेला आणि प्रत्येक सिनेमानंतर त्याची अॅक्शन हिरोची इमेज प्रेक्षकांच्या मनात पक्की होत गेली.राजकुमार संतोषी आणि सनी देओल म्हणजे दिग्दर्शक आणि हिरोची हिट जोडी असंही म्हटलं गेलं. पुढे याच संतोषींबरोबरही सनी देओलचे खटके उडाले. मला राज बद्दल खात्री आहे तो एक दिवस नक्की परतेल असं वक्तव्य सनी देओलने त्यांच्याविषयी केलं होतं.

‘घातक’ या १९९६ मध्ये आलेल्या सिनेमाचा विशेष उल्लेख करावा लागेल. पुन्हा एकदा राजकुमार संतोषी आणि सनी देओल यांची जोडी दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून समोर आली. यातला सनीने साकारलेला ‘काशीनाथ’ हा तर शंकराचा भक्त दाखवण्यात आला आहे. या सिनेमातही अमरिश पुरी आणि सनी देओल होते. पण अमरिश पुरी यांनी सनीच्या वडिलांची भूमिका केली. ‘शंभूनाथ’ हे अमरिश पुरी यांनी साकारेलं पात्र त्यांची व्हिलनची प्रतिमा मोडणारं होतं इतके ते यात सोशिक दिसले आहेत. आपल्या अभिनयातून त्यांनी या भूमिकेत जान आणली आहे. काशीनाथ मुंबईत येतो तेव्हा त्याला खलतं की कात्या नावाचा एक गुंड हप्ता वसुली करतो आहे, आपल्या भागात दादागिरी करतो आहे, अन्याय करतो आहे. त्याच्या कुटुंबावरही तशीच वेळ कात्या आणतो. त्यावेळी अन्यायाविरोधात पेटून उठणारा नायक सनीने यात साकारला आहे. “ये मजदूर का हाथ है कात्या, लोहा पिघलाकर उसका आकार बदल देता है..मुझे किसी के टुकडोंपर पलने की जरुरत नहीं.” “उठा उठा के पटकुंगा सात भाईंयो के एकसाथ मारुंगा.” “मैने सात भाईंयो एकसाथ मारने की कसम क्या खायी सात भाई अलग अलग घुमने लगे.” हे त्याचे आयकॉनिक डायलॉग्ज आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत.

जी गोष्ट घातकची तीच गोष्ट ‘बॉर्डर’ सिनेमाचीही. ‘बॉर्डर’ सिनेमात मेजर कुलदीप सिंग पुरी हे खरोखर घडून गेलेलं पात्र सनी देओलने साकारलं होतं. जे.पी. दत्ता दिग्दर्शित या सिनेमात जॅकी श्रॉफ, सुनील शेट्टी, अक्षय खन्ना आणि सनी देओल अशी तगडी स्टार कास्ट होती. पण यातला सनी देओल भाव खाऊन गेला.

सनी देओल आणि अमिषा पटेल म्हणजेच तारा सिंह आणि सकीना चित्रपटाच्या यशाचे कौतुक करताना आणि एन्जॉय करताना विविध कार्यक्रमांमध्ये दिसत आहेत.

तारा सिंगच्या प्रेमात आजही प्रेक्षक

‘गदर’ मधला ‘तारा सिंग’, अमरिश पुरी बरोबरचा गाजलेला तो प्रसंग, त्यानंतर हँडपंप उखडून टाकत सगळ्यांवर चाल करुन जाणं हे सगळं सगळं प्रेक्षकांना अक्षरशः मॅड करुन टाकणारं होतं. सामान्य माणसावर होणारा अन्याय आणि त्यातून येणारी ताकद काय असू शकते या कल्पनेतून सनीने त्याच्या अनेक भूमिका साकारल्या आहेत. आता वास्तविक हँडपंप उखडून टाकणं ही कल्पनाच ‘लार्जर दॅन लाईफ’ आहे पण ती लोकांना भावली कारण कुटुंबाचं रक्षण करणारा माणूस अन्यायाविरोधात भाष्य करणार असेल तर कसं करेल? तेच सनीने दाखवून दिलं. हँडपंप उखडणं हे तर प्रतीक रुपात आलं होतं. मात्र आजही तो सीन तसाच्या तसा स्मरणात आहे. ‘गदर’ मधला तारा सिंग काय जादू घडवू शकतो हे सिनेमाच्या दुसऱ्या पार्टनेही दाखवून दिलं. २०२३ मध्ये गदर २ आला आणि बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने तगडी कमाई केली. ‘हिंदुस्थान जिंदाबाद’ हा त्याचा संवाद चांगलाच गाजला. आपल्या अभिनयातून सामान्य प्रेक्षकांचं प्रतिनिधीत्व करणारा नायक हा लोकांना आजही आपलासा वाटतो आहे सनी देओलने त्याच्या विविध चित्रपटांमधून दाखवून दिलं आहे. अशा अॅक्शन हिरोला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why did not sunny deol talk to shah rukh khan for 16 years what was that story that happened during the movie darr scj