अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) हे सध्या ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत असल्याचे दिसत आहेत. या कार्यक्रमामध्ये ते त्यांचे अनेक किस्से सांगतात. स्पर्धकांबरोबर गप्पा मारताना बिग बी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी उघड करतात. मात्र, आता एका स्पर्धकानेच बिग बी यांची एक गोष्ट या शोमध्ये सांगितली. अमिताभ बच्चन यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांनी त्यांच्या पुस्तकात ‘काला पत्थर’च्या शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काय घटना घडली होती, त्याचा उल्लेख केला आहे. या पुस्तकाचा संदर्भ देत स्पर्धकाने अमिताभ बच्चन यांना चित्रपटाच्या शूटिंगची आठवण करून दिली. १९७९ साली ‘काला पत्थर’ चित्रपट प्रदर्शित झाला होता.
तरीही शूटिंग तसेच सुरू ठेवले
काला पत्थर हा चित्रपट चासनाला कोळसा खाण आपत्तींपासून प्रेरित आहे. आता नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये कौशलेंद्र यांनी या संदर्भात एक किस्सा सांगितला. ते धनाबाद येथील कोळसा खाणीत काम करतात. त्यांनी बिग बींना त्यांचाच किस्सा सांगितला. त्यांनी म्हटले, “झरिया चासनाला येथील आपत्तीनंतर तुम्ही ‘काला पत्थर’चे शूटिंग केले होते. धरण फुटल्यामुळे ती आपत्ती निर्माण झाली होती. शूटिंगदरम्यान, तो सीन पुन्हा तयार करण्यासाठी तुमच्यावर दूषित पाणी फवारण्यात आले होते. मी असे वाचले की, त्यामुळे तुम्ही आजारी पडला होता. मात्र, तुम्ही तरीही शूटिंग तसेच सुरू ठेवले. हा प्रसंग आमच्या प्रदेशात जवळजवळ सगळ्यांना माहीत आहे. तुमचे वडील हरिवंशराय बच्चन यांनीसुद्धा हा प्रसंग त्यांच्या पुस्तकात लिहिला आहे.”
यश चोप्रा निर्मित व दिग्दर्शित ‘काला पत्थर’ हा चित्रपट धनबादजवळील चासनाला खाण दुर्घटनेवर आधारित होता, ज्यात ३७५ खाण कामगारांना आपला जीव गमवावा लागला होता.
याबरोबरच हरिवंशराय बच्चन यांनी त्यांच्या पुस्तकात आणखी गोष्ट नमूद केली आहे. त्याबद्दल अमिताभ बच्चन यांना सांगताना या स्पर्धकाने म्हटले, “हरिवंशराय बच्चन राय यांनी लिहिले आहे की, तुमचे कुटुंब नेहमी एकत्र जेवायला बसते आणि तुम्ही कायम उत्तरेकडे तोंड करून, डायनिंग टेबलवर बसता. उत्तरेकडे तोंड करून बसल्याने सत्याचा शोध घेता येतो. हरिवंशराय बच्चन यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले की, मी अमिताभला म्हटले होते की, मला सत्याची गरज आहे आणि तुला दीर्घायुष्याची गरज आहे. त्यांनी असेही लिहिलेय की, त्यांना तुम्ही बसलेल्या जागेवर बसण्याची इच्छा होती; पण तुम्ही त्यांना सांगितले की, मला सत्याच्या किमतीवर दीर्घायुष्य नको.”
अमिताभ बच्चन यांनी हे खरे आहे, असे म्हणत वडिलांबरोबर असलेल्या त्यांच्या बॉण्डिंगबद्दल सांगितले. त्यांनी म्हटले, “माझे वडील नेहमी म्हणायचे की, तुला दीर्घायुष्य मिळायला हवे आणि ते त्यांच्यासाठी पुरेसे होते.”
दरम्यान, अमिताभ बच्चन आता कोणत्या नवीन चित्रपटातून भेटीला येणार, याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.