बॉलीवूडमधील असे अनेक कलाकार आहेत, जे सध्या कोणत्याही चित्रपट अथवा वेब सीरिजमध्ये काम करताना दिसत नाहीत. त्यापैकी एक म्हणजे बिपाशा बासू व करण सिंग ग्रोव्हर हे जोडपे. जवळजवळ पाच वर्षे ते कोणत्याही प्रोजेक्टमध्ये अभिनय करताना दिसले नाहीत. ते याआधी शेवटचे भूषण पटेल यांच्या डेंजरस या वेब सीरिजमध्ये एकत्र काम करताना दिसले होते. या वेब सीरिजची निर्मिती प्रसिद्ध गायक मिका सिंग(Mika Singh)ने केली होती. मिका सिंगने याआधी याबाबत एका मुलाखतीत या सेलिब्रिटी जोडप्याबरोबर काम करण्याचा अनुभव भयानक होता, असे म्हटले होते. आता पुन्हा एकदा त्याने यावर वक्तव्य केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिका सिंगने नुकतीच ‘पिंकविला’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत बिपाशाविषयी बोलताना मिका सिंगने म्हटले, “तुम्हाला काय वाटतं? तिला काम का मिळत नसेल? देव सगळं बघतोय”, पुढे गायकाने म्हटले, “मला करण आवडायचा. मला ‘त्या’ चित्रपटाला मदत करायची होती. त्यामुळे माझ्या म्युझिकलासुद्धा फायदा झाला असता. मला फक्त कमी पैशांमध्ये चार कोटींच्या बजेटमध्ये चित्रपट बनवायचा होता. भूषण पटेल यांना दिग्दर्शक म्हणून निवडले, ज्यांनी त्याआधी अलोन या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. त्यामध्ये बिपाशाने दुहेरी भूमिका साकारली होती.”

पुढे मिका सिंगने म्हटले, “मला करण सिंग ग्रोव्हर व एका नवीन मुलीला यामध्ये कास्ट करायचे होते; जेणेकरून माझ्या बजेटमध्ये हा प्रोजेक्ट पूर्ण होईल आणि आम्ही काहीतरी चांगले निर्माण करू शकू. पण,अचानक यामध्ये बिपाशा बासू आली आणि त्यांनी म्हटले की, या सीरिजमध्ये आम्ही दोघेही काम करू. हे शूटिंग लंडनमध्ये होणार होते. बजेट चार कोटींवरून १४ कोटी झाले. बिपाशाने शूटिंगदरम्यान जे काही केले, त्यामुळे मी प्रोडक्शनमध्ये आल्याबद्दल मला कायम पश्चात्ताप राहील.”

‘डेंजरस’च्या शूटिंगदरम्यान काय घडले हे सांगतना मिकाने म्हटले, “करण व बिपाशाने खूप नाटक केले. ते लग्न झालेले जोडपे असल्यामुळे मी त्यांच्यासाठी एक रूम बुक केली होती; पण त्यांनी वेगवेगळ्या खोल्या मागितल्या. मला त्यामागचे लॉजिक समजले नाही. त्यांनी दुसऱ्या हॉटेलमध्ये राहण्याची मागणी केली. आम्ही तेसुद्धा केले. चित्रपटाच्या करारावर सह्या करताना त्यावर स्पष्टपणे स्क्रिप्टमध्ये ‘किसिंग सीन’ असल्याचे लिहिले होते. मात्र, पती-पत्नी असूनही त्यांनी स्क्रीनवर ‘किसिंन सीन’ करण्यासाठी नकार दिला. घसा खवखवत असल्यासारख्या सबबी त्यांनी सांगितल्या. त्यांना त्यांच्या कामाचे पैसे दिले गेले होते. तरीही त्यांनी का नाटक केले, हे मला समजले नाही.”

मिकाने पुढे म्हटले, “ज्या अभिनेत्रींना आता कामं मिळत नाहीयेत, त्या विचार करतात की, त्यांचं नशीब खराब आहे. मात्र, जे निर्माते तुमच्याकडे काम घेऊन येतात, त्यांचा आदर करणं गरजेचं आहे. ते तुमच्यासाठी देव असतात. हे कलाकार धर्मा प्रॉडक्शन, यशराज फिल्म यांसारख्या मोठ्या प्रॉडक्शन वा निर्मात्यांच्या पाया पडतात. अगदी छोट्या भूमिकेसाठीदेखील त्यांचे कौतुक करतात. पण छोट्या निर्मात्यांना आदर देत नाहीत, जे त्यांना बरोबर पैसे देतात.”

दरम्यान, बिपाशा बासू व करण सिंग ग्रोव्हर यांच्याबद्दल बोलायचे, तर हे दोघे २०१५ ला ‘अलोन’ या चित्रपटाच्या सेटवर भेटले. २०१६ ला त्यांनी लग्नगाठ बांधली आणि २०२२ ला त्यांना मुलगी झाली. तिचे नाव देवी, असे आहे. अभिनेत्री अनेकदा तिच्या मुलीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करीत असते. आता ती कोणाच्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.