Khushboo Patni shares Indian Army Experience : बॉलीवूडची बोल्ड व ग्लॅमरस अभिनेत्री दिशा पाटनीची थोरली बहीण खुशबू पाटनी भारतीय सैन्यात मेजर होती. तिने १० वर्षे सैन्यात सेवा बजावली आणि नंतर निवृत्ती घेतली. सैन्यात जाण्याचा निर्णय ते निवृत्ती आणि नवीन प्रवास याबद्दल तिनेच माहिती दिली.
जोश टॉक्समध्ये खुशबूने सांगितलं की ती २००८ मध्ये बरेली सोडून शिक्षणासाठी ग्रेटर नोएडाला आली होती. खुशबूसाठी हे शहर म्हणजे वेगळंच जग होतं. तिला इथे विचित्र अनुभवही आले. तिने सांगितलं की पहिल्या वर्षात काही मुलं तिचा पाठलाग करायचे, आधी ती बाहेर एकटी जायची, पण नंतर मित्र सोबत नसतील तर जायचीच नाही.
खुशबूने सांगितलं की एकदा ती तिच्या एका मैत्रिणीबरोबर बाहेर गेली होती. अचानक एका काळ्या गाडीतील काही तरुण त्यांचा पाठलाग करू लागले. त्यापैकी एकाजवळ बंदुक होती. रात्री उशीर झाल्याने बस, ऑटो मिळत नव्हते. त्या मुलांना घाबरलेल्या खुशबूने स्वतःला सरकारी शौचायलात कोंडून घेतलं होतं. रात्री एक वाजेपर्यंत ती तिथेच थांबली आणि नंतर तिची एक मैत्रीण तिथे आली आणि तिला घेऊन गेली.
पुरुषांची वाटायची भीती
खुशबूने सांगितले की त्यावेळी ती खूप लहान होती. आठवडाभरानंतर तिची परीक्षा होती आणि तिने अभ्यासाला सुरुवात केली. खुशबू म्हणाली, “आता मला वाटतं की मी त्यावेळी रडायला हवं होतं, देवीच्या आशीर्वादाने माझ्या आत एक अनोळखी शक्ती संचारली. मात्र, माझ्या स्वतःच्या अस्तित्वाबाबत माझ्या मनात प्रश्न निर्माण झाले होते आणि मला त्याची उत्तरं मिळत नव्हती. मी इतकी घाबरले होते की मी कोणत्याही पुरुषाच्या नजरेस नजर देऊ शकत नव्हते.”
.. अन् तेव्हा ठरवलं की सैन्यात जायचंय – खुशबू
खुशबूने सांगितलं की कॉलेजच्या चौथ्या वर्षात एक तरुण कॅप्टन तिच्या कॉलेजमध्ये आले होते. त्यांनी भारतीय सैन्याबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्या. सैन्यात का जायला हवं तेही त्यांनी सांगितलं. खुशबू म्हणाली की ते युद्धाचे फोटो दाखवत होते, त्यात एका स्लाइडमध्ये मी महिला अधिकाऱ्याचा फोटो पाहिला. त्यानंतर राष्ट्रगीत वाजते आणि माझ्या मनात एक शक्ती जागृत झाली. त्यानंतर मी सैन्यात जायचं ठरवलं.
खुशबूच्या परीक्षेला फक्त ५ महिने बाकी होते. तिने चांगला अभ्यास केला आणि तिला एका कंपनीत नोकरी मिळाली. घरचे आनंदी झाले, त्यांनी मिठाई वाटली. पण खुशबूच्या मनात वेगळेच विचार सुरू होते. “देवाच्या कृपेने मी एसएसबीची तयारी सुरू केली आणि परीक्षेला गेली. पहिल्याच प्रयत्नात माझं सिलेक्शन झालं. ऑल इंडिया रँकमध्ये माझं नाव आलं आणि मग मी ट्रेनिंगला पोहोचले,” असं खुशबू म्हणाली.
सैन्याच्या ट्रेनिंगबद्दल खुशबू म्हणाली…
खुशबूने ट्रेनिंगदरम्यान केस कापले. मुलं-मुली सर्वांसाठी सारखंच कठोर ट्रेनिंग होतं. मुलांबरोबर स्पर्धा केली आणि त्यामुळे आत्मविश्वास आला, असं खुशबूने नमूद केलं. “मी तिथे बऱ्याच गोष्टी शिकले. ट्रेनिंगनंतर लेफ्टनंट झाल्यावर मला प्रेम, आदर, सन्मान मिळाला. तिथे आम्ही पीडित नाही तर सैनिक होतो,” असं खुशबूने नमूद केलं.
खुशबूने १० वर्षे भारतीय सैन्यात सेवा बजावली. २०२३ मध्ये झालेल्या मणिपूर हिंसाचारादरम्यान ती तिथे कार्यरत होती. तेव्हा मेजर म्हणून खुशबूने पीसकीपिंग ऑपरेशनमध्ये भाग घेतला होता. लोकांशी बोलून हिंसा थांबवायचे प्रयत्न केले. “सैन्याने मला खूप दिलं, पण तिथे एक मर्यादा होती. त्या मर्यादेपलीकडे जाऊन मी लोकांना मदत करू शकत नव्हते, त्यांना मानसिक आधार देऊ शकत नव्हते,” असं खुशबू म्हणाली. सैन्यात १० वर्षांचा प्रवास पूर्ण झाला होता, त्यामुळे आता एक नवीन प्रवास सुरू करावा, असा विचार करून खुशबूने लष्करातून निवृत्ती घ्यायचं ठरवलं.
खुशबू पाटनीने लष्करातून निवत्ती का घेतली?
खुशबूच्या कुटुंबियांचा सुरुवातीला तिच्या सैन्यात जाण्याच्या निर्णयाला पाठिंबा नव्हता. नंतर जेव्हा तिने लष्करातून निवृत्ती घ्यायचं ठरवलं तेव्हाही ते आनंदी नव्हते. “माझा आत्मविश्वास वाढला आणि ३४ व्या वर्षी मी करिअर बदलण्याचा निर्णय घेतला. मी समुपदेशक आणि फिटनेस कोच व्हायचं ठरवलं, कारण तेच करायचं होतं. आता मी खूप खूश आहे. मला वेगवेगळ्या लोकांशी बोलण्याची संधी मिळते, मी त्यांना मानसिक आधार देते. जो सपोर्ट मला त्यावेळी मिळाला नाही, तो मला आता इतरांना द्यायचा आहे,” असं खुशबू म्हणाली.