फार कमी मराठी अभिनेते आहेत ज्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचं असं स्थान निर्माण केलं आहे. त्यापैकी एक नाव म्हणजे नाना पाटेकर. मराठी चित्रपट, नाटकांसह नाना पाटेकर यांनी हिंदी चित्रपटातही मोलाचं योगदान दिलं आहे. राज कुमारपासून दिलीप कुमारपर्यंत कित्येक दिग्गज कलाकारांबरोबर नाना यांनी काम केलं. महानायक अमिताभ बच्चन यांच्याबरोबरही नाना पाटेकर यांनी ‘कोहराम’ या चित्रपटात काम केलं होतं.
मात्र १९९९ चा ‘कोहराम’ हा एकमेव चित्रपट आहे ज्यात हे दोन दिग्गज अभिनेते एकत्र दिसले. त्यानंतर तब्बल २४ वर्षं उलटून गेली तरी अजूनही नाना पाटेकर व अमिताभ बच्चन यांनी एकत्र काम केलेलं नाही. मीडिया रीपोर्टनुसार ‘कोहराम’ चित्रपटाच्या सेटवर अमिताभ बच्चन अन् नाना पाटेकर यांच्यात काही कारणास्तव खटके उडाले होते. यामुळे नंतर त्यांनी एकमेकांबरोबर काम करायचं टाळलं.
आणखी वाचा : ‘सत्यप्रेम की कथा’मधील ‘पसूरी’ गाण्याचं रिमेक पाहून नेटकरी संतापले; म्हणाले “गरुड पुराणात…”
याविषयी २०१५ मध्ये इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये नाना पाटेकर यांनी खुलासा केला होता. ते दोघे पडद्यामागे खूप चांगले मित्र आहेत अन् भविष्यात चांगली कथा आल्यास आम्ही एकत्र नक्कीच काम करू अशी ग्वाहीदेखील नाना पाटेकर यांनी या मुलाखतीमध्ये दिली होती. २०१६ च्या नाना पाटेकर यांच्या ‘नटसम्राट’च्या हिंदी रिमेकमध्ये महेश मांजरेकर अमिताभ बच्चन यांना घेऊ इच्छित होते.
बिग बी यांनी मात्र हा चित्रपट करण्यास नकार दिला होता. नाना पाटेकर यांच्या अभिनयाच्या मी जवळपासही जाऊ शकत नाही असं सांगत त्यावेळी अमिताभ यांनी नाना पाटेकर यांच्या कामाचं कौतुक केलं होतं. सध्या नाना पाटेकर विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द व्हॅक्सीन वॉर’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. अमिताभ बच्चन प्रभास, दीपिका पदूकोण अन् कमल हासनसह ‘प्रोजेक्ट के’ या चित्रपटावर काम करत आहेत. या दोन दिग्गज कलाकारांना पुन्हा एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक फार उत्सुक आहेत.