गेल्या काही दिवसांपासून शाहरुख खानच्या ‘जवान’ची जबरदस्त चर्चा आहे. ७ सप्टेंबरला ‘जवान’ जगभरात प्रदर्शित झाला असून चित्रपटाने ग्रँड ओपनिंग केली. बॉक्स ऑफिसवर शाहरुख खानच्या चित्रपटाने धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. देशभरात चित्रपटाने ७५ कोटी रुपये कमावले. यापैकी ६५ कोटींची कमाई एकट्या हिंदी भाषेत केली. तर तमिळ व तेलुगू भाषेत चित्रपटाने प्रत्येकी ५-५ कोटी रुपये कमावले.
या चित्रपटात शाहरुख खानचं पात्र हे थोडंसं ग्रे शेडमधलं असल्याने चाहते त्याच्या या अवताराची आतुरतेने वाट बघत होते. शाहरुखची ओळख रोमान्स किंग म्हणून जरी असली तरी त्याच्या सुरुवातीच्या काळात त्याने खलनायकाची भूमिका साकारून प्रेक्षकांना भुरळ घातली. ‘डर’, ‘अंजाम’, ‘बाजीगर’सारख्या चित्रपटातून शाहरुखने नकारात्मक भूमिका अशा रीतीने साकारली की तोच चित्रपटाचा नायक भासायचा.
आणखी वाचा : राम गोपाल वर्मा करणार अभिनयात पदार्पण; प्रभासच्या ‘या’ आगामी चित्रपटात साकारणार ‘ही’ भूमिका
‘बाजीगर’मध्ये शाहरुखने सर्वप्रथम खलनायक साकारला अन् प्रेक्षकांनी त्याला डोक्यावर घेतलं. अब्बास-मस्तान या जोडगोळीने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाला आज ‘कल्ट क्लासिक’चा दर्जा मिळाला आहे. सगळ्याच बाबतीत ‘बाजीगर’ वेगळा होता. या चित्रपटात शाहरुखच्या सासऱ्यांची भूमिका साकारणारे दलिप ताहील यांनीच या चित्रपटाच्या मेकिंगबद्दल बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला आहे.
‘Untriggered with Aminjaz’ या कार्यक्रमात दलिप ताहील यांनी ‘बाजीगर’च्या स्पेशल स्क्रीनिंगच्या आठवणी सांगितल्या. हा चित्रपट पाहून वितरक आणि चित्रपटगृहांचे मालक फारच नाराज झाले कारण यातील मुख्य नायक हा नायिकेला इमारतीच्या छतावरुन खाली ढकलुन तिचा खूण करतो. ही गोष्ट त्या काळात बऱ्याच लोकांना पचणारी नव्हती, तेव्हाचे प्रेक्षकही ही गोष्ट पाहून हैराण झाले असल्याचं दलिप यांनी स्पष्ट केलं.
याच कारणामुळे ‘बाजीगर’मधील शाहरुख खानची भूमिका बऱ्याच लोकांनी नाकारली होती याचाही दलिप ताहील यांनी खुलासा केला. दलिप ताहील म्हणाले, “हा चित्रपट फारच वेगळा होता. सहसा चित्रपटातील नायक हा नायिकेचा इतक्या थंड डोक्याने खून करत नाही. शाहरुखशिवाय बऱ्याच लोकांनी ही भूमिका यामुळेच नाकारली. शाहरुखने मात्र फार उत्तमरीत्या ती भूमिका साकारली आणि ‘बाजीगर’ एक आयकॉनिक चित्रपट बनला.”