सलमान खान आणि दिग्दर्शक सूरज बडजात्या यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात एकत्र काम केले होते. त्यांचा पहिला चित्रपट ‘मैने प्यार किया’ सुपरहिट ठरला आणि त्यानंतर त्यांनी ‘हम आपके हैं कौन’ आणि ‘हम साथ साथ हैं’ यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम करत यशस्वी दिग्दर्शक आणि अभिनेत्याची जोडी निर्माण केली. मात्र, जेव्हा सूरज यांनी ‘विवाह’ चित्रपट तयार करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्यांना वाटले की सलमान या भूमिकेसाठी योग्य निवड ठरणार नाही. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सूरज यांनी ‘विवाह’ सिनेमासाठी सलमान खान ऐवजी शाहिद कपूरला का कास्ट केले याचे कारण सांगितले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘डिजिटल कमेंट्री’शी संवाद साधताना सूरज यांना विचारण्यात आले की, अनेक चित्रपटांमध्ये सलमानबरोबर काम करूनही त्यांनी ‘विवाह’साठी शाहिद कपूरला का निवडले? यावर सूरज म्हणाले, “जेव्हा मी दिग्दर्शक होण्याचा निर्णय घेतला, तेव्हाच ठरवले की मी कोणताही तडजोड करणार नाही.” त्यांनी सांगितले की, ‘मैं प्रेम की दीवानी हूँ’ या चित्रपटाच्या मोठ्या अपयशानंतर ‘विवाह’चे काम सुरू झाले. या चित्रपटात करीना कपूर, अभिषेक बच्चन आणि हृतिक रोशन मुख्य भूमिकेत होते.

सूरज यांनी सांगितले की, ‘मैं प्रेम की दीवानी हूँ’ चित्रपटाच्या अपयशानंतर लगेचच सलमानने त्यांना फोन करून पुन्हा एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली. “मैं प्रेम की दीवानी हूँ’ अपयशी ठरल्यानंतर सलमानचा फोन आला आणि तो म्हणाला, ‘चला, आपण एकत्र काहीतरी काम करूया.’ पण त्यावेळी माझ्याकडे सलमानसाठी कोणतीही कथा नव्हती आणि ‘विवाह’ ही माझ्या वडिलांनी सांगितलेली कथा होती,” असे सूरज यांनी नमूद केले.

सूरज म्हणाले की, “जेव्हा मी ‘विवाह’ चित्रपट बनवायचा ठरवला, तेव्हा मला समजले की सलमान या भूमिकेसाठी योग्य निवड ठरणार नाही कारण तो मोठा स्टार झाला होता,” ते म्हणाले “या भूमिकेसाठी निरागसपणा आणि विशिष्ट वय असावे लागते आणि कुणाचेच वय थांबत नाही. त्यामुळे शाहिद आणि अमृता यांची निवड करण्यात आली.”

सलमान आणि सूरज यांनी ‘हम साथ साथ हैं’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. याच चित्रपटाच्या राजस्थानमधील शूटिंगदरम्यान सलमानवर काळवीट (ब्लॅकबक) शिकारीचा आरोप झाला होता. २०२४ मध्ये, त्याच प्रकरणाच्या संदर्भात लॉरेंस बिश्नोईच्या समर्थकांनी सलमानच्या घरावर गोळीबार केला होता. सलमान आणि सूरज यांनी २०१५ मध्ये आलेल्या ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटात अनेक वर्षांनंतर एकत्र काम केले, यामध्ये सलमानसह सोनम कपूर मुख्य भूमिकेत होती.