बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानची सध्या सगळीकडेच जबरदस्त चर्चा आहे. ‘पठाण’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. तब्बल ४ वर्षांनी शाहरुखने मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं आहे. शाहरुखच्या २००४ साली प्रदर्शित झालेल्या ‘मै हूं ना’ या चित्रपटातील तब्बूने केलेल्या कॅमिओची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे.
२००४ साली आलेल्या या चित्रपटात तब्बूने फक्त काही सेकंदासाठी एक कॅमिओ केला होता. तब्बूसारख्या मोठ्या अभिनेत्रीने एवढ्या छोट्या वेळासाठी हा कॅमिओ का केला याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. एका नेटकऱ्याने या चित्रपटातील तब्बूचा हा छोटा सीन शेअर करत यामागील कारण विचारलं आहे. या फोटोवर ‘मै हूं ना’ची दिग्दर्शिका फराह खानने उत्तर दिलं आहे.
आणखी वाचा : “तो स्वतःच्या मनाचा राजा…” राम गोपाल वर्मा यांच्या स्वभावाबद्दल मनोज बाजपेयींनी केला खुलासा
तब्बूने एवढ्या छोट्या कॅमिओसाठी होकार कसा दिला या प्रश्नावर फराह खान म्हणाली, “त्यावेळी तब्बू दार्जिलिंगमध्ये तिच्या एक वेगळ्या शूटसाठी आली होती. त्यामुळे ती मला ‘मै हूं ना’च्या सेटवर भेटायला आली होती. तेव्हा मीच तिला त्या एका छोट्या शॉटसाठी उभं केलं आणि तीनेसुद्धा आढेवेढे न घेता स्वतःचेच कपडे परिधान करून त्या सीनसाठी तयार झाली आणि अशा रीतीने तो कॅमिओ शूट झाला.”
२००४ साली आलेल्या ‘मै हूं ना’ हा चांगलाच गाजला. या चित्रपटात शाहरुख खानने मेजर राम शर्मा ही एका आर्मी ऑफिसरची भूमिका साकारली. दिग्दर्शिका म्हणून हा फराह खानचा पहिला चित्रपट होता. तब्बू नुकत्याच आलेल्या ‘कुत्ते’ आणि ‘दृश्यम २’ या चित्रपटात झळकली. आता ती अजय देवगणबरोबर आगामी ‘भोला’ या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.